मिरज / मानसिंगराव कुमठेकर :
सांगली, मिरज शहरात तत्कालिन राजांच्या नावांनी असलेली वैशिष्ट्यपूर्ण शिवमंदिरे आहेत. ज्या संस्थानिकांनी ही मंदिरे बांधली, त्यांचे स्मरण कायम राहावे, या हेतूने या शिवमंदिरांना ही नावे दिली आहेत. सांगलीमध्ये गणपती मंदिराच्या आवारात असलेले चिंतामणेश्वर, मिरजेमध्ये किल्ला भागात माधवजी मंदिरातील गंगाधरेश्वर आणि मिरज मळ्यात असलेले लक्ष्मणेश्वर अशी ही मंदिरे होत.
सांगली मिरज शहरात राज्य करणारे पटवर्धन संस्थानिक हे गणेशाचे भक्त होते. श्री गणेश हे त्यांचे आराध्य दैवत. त्यामुळे पटवर्धन संस्थानिक ज्या, ज्या गावी राहिले त्या ठिकाणी श्री गणेशाचे मंदिर हमखास पहावयास मिळते. ही पटवर्धन राजे मंडळी गणेशभक्त तर होतीच, शिवाय शिवभक्तही होती. त्यामुळे त्यांनी आपले आराध्य दैवत श्री गणेशा बरोबरच शिवमंदिरेही स्थापन केल्याचे दिसतात. सांगली, मिरज, तासगाव, जमखंडी गणेशवाडी या ठिकाणी ही शिवमंदिरे आहेत. या मंदिरांचे स्वरूप मोठे नसले तरी ती वैशिष्ट्यपूर्ण नावाने ओळखती जातात.
- गंगाधरेश्वर मंदिर
मिरज संस्थानचे अधिपती श्रीमंत गंगाधरराव बाळासाहेब पटवर्धन (पहिले) यांच्या कार्यकीर्दीत मिरजेच्या ऐतिहासिक किल्ला भागात माधवजीचे मंदिर उभारले गेले. किल्ल्यात असणाऱ्या राजवाड्यासमोरच माधवजीचे म्हणजे विष्णूचे मंदिर उभारण्यात आले. या मंदिराची रचना पंचायतन स्वरूपाची होती. सदरचे मंदिर हे सन १८९९ मध्ये बांधून तयार झाले. मंदिरात मुख्य गाभाऱ्यात विष्णू-लक्ष्मी म्हणजेच लक्ष्मीनारायण मूर्ती आहे. यातील विष्णूचे रूप हे माधवाचे आहे. पटवर्धन संस्थानिकांची सवाई माधवराव पेशव्यांवर श्रद्धा असल्याने त्यांच्या नावाने सदरचे विष्णू मंदिर हे माधवजी मंदिर या नावाने ओळखले जाते. या मंदिराच्या एका बाजूला शिवमंदिर असून दुसऱ्या बाजूला गणेश मंदिर आहे.
यातील शिवमंदिराला गंगाधरेश्वर या नावाने ओळखले जाते. श्रीमंत गंगाधरराव पटवर्धन यांनी हे मंदिर स्थापन केल्यामुळे या शिवलिंगाला गंगाधरेश्वर असे संबोधण्यात येते. माधवजी मंदिरातील या गंगाधरेश्वराची श्रावण महिन्यात पूजा केली जाते. त्यावेळी दररोज अभिषेक घालण्यात येत होता. महाशिवरात्रीलाही या गंगाधरे श्वराच्या ठिकाणी कार्यक्रम होत असत. मंदिर हे मराठाकालीन वास्तुकलेचे उत्तम नमुना म्हणून ओळखले जाते. अव्वल पेशवेकाळात हे मंदिर बांधले गेले आहे.
- चिंतामणेश्वर मंदिर
सांगलीमध्ये ऐतिहासिक गणेश मंदिराच्या भोवती अन्य चार देवतांची मंदिरे आहेत त्यामुळे सांगलीच्या गणपती मंदिराला श्री गणेश पंचायतन असे संबोधले जाते. या पंचायतनामध्ये मध्यभागी श्री गणेशाचे मुख्य मंदिर, त्या भोवती महादेव, सूर्यनारायण, देवी आणि विष्णूचे मंदिर आहे. त्यापैकी शिवमंदिर हे चिंतामणेश्वर या नावाने ओळखले जाते. सांगलीचे गणपती मंदिर आणि पंचायतनाची रचना ही सांगली संस्थानचे संस्थापक श्रीमंत चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन पहिले यांच्या कारकिर्दीत झाली. त्यामुळे पंचायतनामधील शिव मंदिराला चिंतामणेश्वर या नावाने संबोधले जाते.
सांगलीचे गणपती मंदिर हे सन १८११ ते १८४४ दरम्यान बांधले गेले. २९ मार्च १८४४ रोजी श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. याचवेळी पंचायतनाच्या अन्य मंदिरांचे काम सुरू होते. परंतु पंचायतन मंदिरांची प्रतिष्ठापना १८४५ च्या फाल्गुन महिन्यात करण्यात आली. म्हणजेच चिंतामणेश्वराची स्थापना १८४५ च्या फाल्गुन महिन्यात झाल्याचे दिसते. पंचायतनाची ही मंदिरे त्यावेळी पूर्ण स्वरूपात नव्हती. ती टप्प्याटप्याने विविध कालखंडात पूर्ण झाल्याचे दिसते. तात्पुरता चुन्याचा गिलावा करून, त्यावर लाकडी शिखर बसवले होते. त्यापैकी शिवमंदिराला चिंतामणेश्वर या नावाने ओळखण्यात येते. श्रावण आणि महाशिवरात्रीला चिंतामणेश्वराला अभिषेक व धार्मिक विधी करण्याची परंपरा आहे. तत्कालीन अनेक कागदपत्रांमध्ये श्रावण महिन्यात सदर चिंतामणेश्वराला अभिषेक केल्याचे नोंदी आहेत.
- लक्ष्मणेश्वर मंदिर
मिरजेच्या पश्चिमेला सध्याच्या शासकीय दुग्धालयाला लागून असणाऱ्या भागाला मिरज मळा असे संबोधण्यात येते. पूर्वी मिरज संस्थानच्या वाटण्या झाल्यानंतर त्यातील एक भाग मिरज मळा म्हणून ओळखला गेला. मिरज मळा संस्थानची राजधानी ही सध्या ज्या ठिकाणी गुलाबराव पाटील महाविद्यालय आहे, त्याठिकाणी होती. याच संस्थानाला पुढे बुधगाव संस्थान म्हणून ओळखण्यात येऊ लागले. याच मिरज मळ्यात लक्ष्मणेश्वराचे मंदिर आहे. सदरचे मंदिर हे सन १८८२ मध्ये मिरज मळा संस्थानचे अधिपती श्रीमंत लक्ष्मणराव माधवराव पटवर्धन उर्फ अण्णासाहेब यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या पत्नी गिरीजाबाई यांनी स्थापन केले.
पतीच्या स्मरणार्थ या मंदिराला गिरीजाबाईंनी लक्ष्मणेश्वर असे नाव दिले. सदरचे मंदिर हे वैशिष्ट्यपूर्ण रचनेचे आहे. उंच दगडी गाभारा, त्यासमोर लाकडी सभामंडप आहे. सभामंडपामध्ये श्रीमंत लक्ष्मणराव पटवर्धन यांची संगमरवरी मूर्तीही स्थापन करण्यात आली आहे. गिरिजाबाईंनी लक्ष्मणेश्वराच्या मंदिराबरोबर शेजारी धर्मशाळा व विहिरही बांधली.
श्रीमंत लक्ष्मणराव पटवर्धन हे शिवभक्त होते. त्यांनी सन १८७१ मध्ये काशीयात्रा केली होती. ते १८७६ रोजी मरण पावले. मृत्यूपूर्वी त्यांनी शिवमंदिर बांधण्याची इच्छा व्यक्त केली होती. ही इच्छा त्यांच्या पत्नी गिरीजाबाई यांनी मिरजमळ्यात शिवमंदिर बांधून पूर्ण केली. या मंदिराला पतीच्या स्मरणार्थ लक्ष्मणेश्वर हे नाव दिले आहे. या गिरीजाबाई पटवर्धन इचलकरंजीचे संस्थानिक घोरपडे यांच्या कन्या होत. त्या मुत्सद्दी आणि धोरणी होत्या. संस्थानचा कारभार बऱ्याचदा त्याच पाहत असत. सांगली, मिरज शहरातील वैशिष्ट्यपूर्ण नावे असलेली शिवमंदिरे आणि त्या नावां मागची कहाणी अपरिचीत आहे. या मंदिरावरून तत्कालीन राजांची शिवभक्ती ध्यान्यात येते








