खानापूर-हेब्बाळ येथे काढली मिरवणूक : शिवरायांच्या पुतळय़ाचे सर्वत्र उत्साहात स्वागत

वार्ताहर /नंदगड
हेब्बाळ (ता. खानापूर) येथे बसविण्यात येणाऱया छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाची शुक्रवारी खानापूर शहरासह हेब्बाळ गावात भव्य मिरवणूक काढण्यात आली. शनिवार दि. 3 सप्टेंबर रोजी पुतळा अनावरण कार्यक्रम आयोजित केला आहे. शुक्रवारी सकाळी 11 वाजता ट्रकमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा ठेवला होता. समोर शिवमुद्रा, ढोलताशा, कडोली येथील पथकाचे साठहून अधिक कार्यकर्ते ढोलवादन करत होते. भगवे फेटे परिधान करुन हेब्बाळ गावचे शेकडो नागरिक या मिरवणुकीत सहभागी झाले होते. मिरवणूक पाहण्यासाठी खानापुरात एकच गर्दी झाली होती.
शिवरायांच्या पुतळय़ाच्या स्वागतासाठी हेब्बाळ गाव शुक्रवारी सकाळपासूनच सज्ज झाले होते. गावच्या प्रमुख वेशीत भव्य स्वागत बॅनर लावण्यात आले होते. प्रत्येकाच्या घरासमोर रांगोळी काढून, भगव्या पताका लावण्यात आल्या आहेत. एखाद्या घरातील लग्नसमारंभ असावा अशाप्रकारे प्रत्येक घर सजवले होते. प्रत्येकाच्या चेहऱयावर उत्साह दिसून येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जयघोष मिरवणुकीत करण्यात येत होता.









