छत्रपती शिवाजी महाराज-मावळ्यांवर रांगोळ्या साकारण्यास सुरुवात
बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथतर्फे 11 ते 14 फेब्रुवारीदरम्यान शिवकालीन भव्य शस्त्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा मंदिर येथे होणाऱ्या या प्रदर्शनासाठी जय्यत तयारी केली जात आहे. नाशिक येथील साई आर्ट्सच्या कलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या मावळ्यांवर आधारित रांगोळ्या साकारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे प्रदर्शन बेळगावच्या शिवप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे. शिवकालीन शस्त्रप्रदर्शन, मराठा आरमार व शिवकालीन रांगोळी असे हे प्रदर्शन होणार आहे. सकाळी 10 ते रात्री 9 पर्यंत प्रदर्शन शालेय विद्यार्थ्यांना मोफत पाहता येणार आहे. मंगळवारी सकाळी 10 वाजता गोवावेस येथील स्वीमिंग पूलपासून मिरवणूक काढली जाणार आहे. त्याचबरोबर स्वराज्यातील अनेक सरदार व मावळ्यांचे वंशजही यावेळी उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी 4 वाजता वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अधिकाधिक शिवप्रेमींनी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथतर्फे करण्यात आले आहे.









