बेळगाव : आपल्या अतुलनीय पराक्रमाने ज्यांनी साम्राज्य उभे केले, शौर्य, साहस यांचा वस्तुपाठ घालून दिला. ज्यांच्या नावाच्या घोषणेने आजही मनामनात स्फुल्लिंग चेतविले जाते, त्या छत्रपती शिवरायांचा इतिहास सांगणाऱ्या चित्ररथ मिरवणुकीच्या निमित्ताने जणू शिवतेज उसळले अन् अवघे शहर चैतन्याने सळसळले. दरवर्षी या मिरवणुकीचे महत्त्व वाढत असून गर्दीही दरवर्षी नवनवीन उच्चांक करत आहे. यंदाची मिरवणुकीनेही याचेच प्रत्यंत्तर दिले.
गुऊवारी सायंकाळी ठीक 6.30 वाजता पालखी पूजनाने शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीला सुरुवात झाली. काही मंडळांनी पुढाकार घेत यावर्षी देखावा सादरीकरणाला रात्री 8 वाजल्यापासून सुरुवात केली. ढोलताशा, करेला, लाठीमेळा यांचे सादरीकरण करत चित्ररथ मिरवणुकीला रंगत आणण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित देखावे सादर करण्यात आले. रात्री 11 नंतर देखावे सादर करणाऱ्यांची संख्या वाढली. मारुती गल्ली, रामदेव गल्ली येथे शिवप्रेमींची प्रचंड गर्दी झाली होती.
मागील वर्षी पावसामुळे शिवप्रेमींचा हिरमोड झाला होता. यावर्षी मात्र देखावे पाहण्याचा आनंद पुन्हा अनुभवला. वयोवृद्धांपासून बालचमूंपर्यंत शिवप्रेमी मिरवणुकीत सहभागी झाले होते. यावर्षी डीजेला फाटा देत बऱ्याच मंडळांनी चित्ररथ सादर करण्याला प्राधान्य दिले. काही मोजक्याच मंडळांनी डीजे लावल्याचे दिसून आले. मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळ व शिवप्रेमींनी केलेल्या आवाहनाला मंडळांनी योग्य प्रकारे प्रतिसाद दिला.
कांगली गल्ली मंडळाने जिंकली मने
एकता युवक मंडळ, कांगली गल्ली या मंडळाने यावर्षी अतिशय सुंदर असा देखावा सादर केला. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण व आजची तरुणाई या विषयावर त्यांनी समर्पक असा सजीव देखावा सादर केला. शिवजयंतीच्या नावावर डीजेचा सुरू असलेला धिंगाणा आणि या दरम्यान होणारे मद्यपान व महिलांची छेडछाड या विषयी त्यांनी देखावा सादर करून शिवाजी महाराज यांची शिकवण काय होती, याची माहिती नाटिकेतून दिली.
मुजावर गल्ली येथील राजेशाही युवक मंडळाने पारंपरिक पद्धतीने बैलजोडीची सजावट करून ती मिरवणुकीत आणली होती. विशेष म्हणजे या बैलजोडीच्या दोऱ्या तरुणीच्या हातात देण्यात आल्या होत्या. काकती येथील लाठीमेळा पथकाने सुंदररीत्या प्रात्यक्षिक सादर केले. शिवनिश्चय लाठीमेळा पथकाने लाठीमेळा, तलवारबाजी यासह इतर प्रात्यक्षिके सादर केली. रामामेस्त्राr अड्डा येथील बालशिवाजी युवक मंडळाने छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित देखावा सादर केला. ताशिलदार गल्ली येथील मंडळाच्या महिलांनी देखावा सादर केला. यावर्षी साडेसातच्या सुमारास सह्याद्रीपुत्र युवक मंडळ, छत्रपती शिवाजी रोड या मंडळाने सर्वप्रथम देखावा सादर केला. त्यापाठोपाठ कांगली गल्ली येथील एकता युवक मंडळाने देखावे सादर करण्यास सुरुवात केली.
गवळी गल्ली मंडळाचा एकतेचा संदेश
आपला समाज हा जातीपातींमध्ये विभागला गेला असल्याने शत्रू आपल्यावर चाल करतो. त्यामुळे मराठा, लिंगायत, वाणी, ब्राह्मण यासह इतर जातींमध्ये विभागून राहण्यापेक्षा एकत्र या आणि देशाला पुढे घेऊन जा, असा एकतेचा संदेश गवळी गल्ली मंडळाने दिला. लहान बालकांनी हातांमध्ये संदेश देणारे फलक धरले होते. महानगरपालिकेच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी धर्मवीर संभाजी चौक येथे प्रेक्षक गॅलरीची व्यवस्था केली होती. परंतु, देखावे सादर करणारी मंडळे लवकर पुढे सरकत नसल्यामुळे प्रेक्षक गॅलरीतील शिवप्रेमी बऱ्याच वेळाच्या प्रतीक्षेनंतर मिरवणूक मार्गाकडे निघाली. यामुळे यावर्षी रात्री एक वाजेपर्यंत प्रेक्षक गॅलरीचा तितकाचा उपयोग झाला नसल्याचे दिसून आले.
ढोलताशा मंडळांचाच आवाज
बेळगावच्या नरवीर ढोलताशा पथक व रणरागिणी ध्वजपथकाने यावर्षीही शेकडोंच्या संख्येने उपस्थित राहून सुंदररीत्या वादन केले. एकाच सुरात शंभरहून अधिक ढोलवादक वादन करीत होते. त्याला झांज आणि ताशांची साथ मिळाली. त्याचबरोबर शंभरहून अधिक ध्वजधारी तरुणी ढोलताशांच्या आवाजावर ध्वज नाचवत होत्या. त्यामुळे हे ढोलताशा वादन पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.
यावर्षीही विस्कळीतपणाचा अनुभव
शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीला चांगले वळण लागावे, यासाठी शिवप्रेमींची धडपड सुरू होती. मोठ्या प्रमाणात जागृती झाल्यानंतर यावर्षी चित्ररथ सादर करणाऱ्या मंडळांची संख्या वाढली होती. परंतु, गुरुवारी रात्री मिरवणुकीत ढिसाळ नियोजन दिसून आले. एकामागून एक चित्ररथ पुढे सरकणे गरजेचे होते. परंतु, चित्ररथ पुढे सरकत नसल्याने रामदेव गल्ली, गणपत गल्ली, हुतात्मा चौक या ठिकाणी प्रचंड गर्दी झाली. त्यामुळे बऱ्याच वेळा चेंगराचेंगरीही होत होती. अरुंद गल्ल्यांमध्येच देखावे सादर होत असल्याने शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली.
वाहनाच्या चेस्सीची जमवाजमव तसेच इतर साहित्य जमवणे मंडळांसाठी डोकेदुखीचे ठरत होते. त्यामुळे यावर्षी काही मंडळांनी एकाच ठिकाणी स्टेज घालून देखावे सादर केले. बापट गल्ली येथील मंडळाने संयुक्त महाराष्ट्र चौक येथे भक्ती-शक्ती संगमाचा अप्रतिम देखावा सादर केला. त्याचबरोबर कांगली गल्ली मंडळाने शिवजयंती मिरवणुकीतील धांगडधिंगाणा बंद करा, यावरील देखावा सादर केला. या दोन्ही मंडळांनी एकाच ठिकाणी स्टेजवर देखावे सादर केले. रात्री उशिरा डीजे लावलेली मंडळे मिरवणुकीत दाखल झाली. देखावे सादर करणाऱ्या मंडळांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी डीजे लावलेल्या मंडळांना काकतीवेस रोड मार्गे गणपत गल्ली येथे सोडण्यात आले. रात्री 12 नंतर काकतीवेस परिसरात डीजेचा आवाज घुमत होता.
चव्हाट गल्लीचा ‘गड आला पण…’
चव्हाट गल्ली येथील शिवजयंती मंडळाने यावर्षी भव्यदिव्य देखावा सादर केला. 60 हून अधिक कलाकार असलेला अप्रतिम देखावा मंडळाने सादर केला. काही ठरावीक ठिकाणी देखावा दाखवण्यात आला. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित ‘गड आला पण सिंह गेला’ हा देखावा सादर करून शिवप्रेमींची मने जिंकली. शिवप्रेमींनी हा देखावा पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
सलग सुट्यांमुळे मिरवणुकीत प्रचंड गर्दी
यावर्षी चित्ररथ मिरवणुकीला शिवप्रेमींची प्रचंड गर्दी झाल्याचे दिसून आले. मध्यरात्रीपर्यंत शिवप्रेमींचा उत्साह टिकून होता. बुधवारी बसवेश्वर महाराज जयंती व गुरुवारी कामगार दिन असल्यामुळे बरीच कार्यालये व संस्थांना सुट्या होत्या. सलग सुट्यांमुळे चित्ररथ पाहण्यासाठी आलेल्या शिवभक्तांची मोठी गर्दी झाली होती. मागील दोन-चार वर्षांच्या तुलनेत यावर्षी गर्दीचा विक्रम झाल्याचे ठिकठिकाणी दिसून येत होते.









