अमरनाथ यात्रेची जगभरात ख्याती यंदा भाविकांसाठी 62 दिवसांची पर्वणी
जम्मू-काश्मीरमधील प्रसिद्ध अमरनाथ गुहा हे भगवान शिवाच्या प्रमुख धार्मिक स्थळांपैकी एक आहे. येथेच भगवान शिवाने माता पार्वतीसमोर अमरत्वाचे रहस्य प्रकट केल्याने अमरनाथला तीर्थक्षेत्र म्हटले जाते. दरवर्षी जुलै-ऑगस्टच्या दरम्यान ही यात्रा भरते. बर्फाळ प्रदेश आणि डोंगर-दऱ्यांच्या मार्गातून आव्हानात्मक प्रवास करत लाखो शिवभक्त बर्फ स्वरुपातील शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी येथे नतमस्तक होतात. यंदा एक जुलैपासून सुरू झालेली ही यात्रा 31 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. यंदाचा यात्रा कालावधी तब्बल 62 दिवसांचा असल्यामुळे नैसर्गिक आपत्तींचे विघ्न न आल्यास विक्रमी संख्येने लाखो भाविक शिललिंगचरणी लीन होतील, अशी अपेक्षा आहे. त्या अनुषंगाने या जगप्रसिद्ध अमरनाथ यात्रेचा घेतलेला हा लेखाजोखा….

अमरनाथ हे हिंदू धर्मियांचे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. अमरनाथच्या पवित्र गुहेत बर्फापासून बनलेले नैसर्गिक शिवलिंग हे येथील मुख्य वैशिष्ट्या आहे. हे शिवलिंग नैसर्गिक बर्फापासून बनलेले असल्याने याला स्वयंभू हिमानी शिवलिंग असेही म्हणतात. आषाढ पौर्णिमेपासून ते रक्षाबंधन-नारळी पौर्णिमेपर्यंत संपूर्ण श्रावण महिन्यात होणाऱ्या यात्रेत पवित्र हिमलिंगाच्या दर्शनासाठी लाखो लोक येथे येतात. गुहेमधील दर्शनावेळी येथे हिम-पाण्याचे थेंब टपकत राहतात. येथेच दहा फूट लांबीचे शिवलिंग तयार झाले आहे. चंद्राच्या आकाराप्रमाणे या बर्फाचा आकारही कमी-जास्त होत जातो. श्रावण पौर्णिमेला पूर्ण आकारात असलेले हिमलिंग अमावास्येपर्यंत हळूहळू लहान होत जाते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे शिवलिंग कठीण बर्फापासून बनलेले असते. तर गुहेत अन्यत्र विखुरलेला बर्फ ठिसूळ असल्यामुळे तो हातात घेतल्यानंतर काही वेळातच वितळून जातो. मूळ अमरनाथ शिवलिंगापासून काही फूट अंतरावर गणेश, भैरव आणि पार्वतीचे स्वतंत्र हिमखंडही आहेत. सिंध व्हॅलीमध्ये असलेली ही गुहा हिमनद्या, बर्फाच्छादित पर्वतांनी वेढलेली आहे. ती यात्रेकरुंसाठी खुली असताना उन्हाळ्यातील काही काळ वगळता बहुतेक वर्षभर बर्फाने झाकलेली असते.
अमरनाथ यात्रेचा प्रवास ‘छडी मुबारक’ सोबत असून यात्रेकरू गटा-गटाने आपला प्रवास सुरू करतात. यात हातात त्रिशूल आणि डमरू घेऊन मोठ्या श्र्रद्धेने आणि भक्तीभावाने असंख्य साधूही हजेरी लावतात. ‘बम-बम भोले आणि जयकारा वीर बजरंगी-हर हर महादेव’ असा जयघोष सदैव सुरू असतो.
अमरनाथ गुहा हे धार्मिक ठिकाण श्रीनगरच्या उत्तर-पूर्वेस 135 किमी अंतरावर असून समुद्रसपाटीपासून 13,600 फूट उंचीवर आहे. या गुहेची लांबी 19 मीटर आणि रुंदी 16 मीटर आहे. ही गुहा 11 मीटर उंच आहे.
अमरनाथची ‘अमरकथा’
अमरनाथसंबंधीच्या कथेचे नाव ‘अमरकथा’ असे आहे. भगवान शंकरांनी अमरनाथच्या गुहेत भगवती पार्वतीला कथा सांगितली. ही कथा ऐकूनच श्री शुकदेवजी अमर झाले. भगवान शंकर जेव्हा भगवती पार्वतीला ही कथा सांगत होते, तेव्हा तिथे एक कबुतराचे पिल्लूही परम पवित्र कथा ऐकत होते. कथा ऐकत असतानाच त्या कबुतराच्या पिल्लाला श्री शुकदेवाचे रुप दिसले असे मानले जाते. आजही कबुतरांची जोडी अमरनाथ गुहेत असल्याचे बोलले जाते. काही नशीबवान व्यक्तींनाच कबुतरांची जोडी पाहायला मिळते, असेही मानले जाते.

अमरनाथ गुहेचा शोध-इतिहास
पौराणिक कथेनुसार अमरनाथ गुहेचा शोध भृगू मुनींनी लावला होता. फार पूर्वी काश्मीर खोरे पाण्यात बुडाल्यानंतर कश्यप मुनींनी नद्या-नाल्यांद्वारे पाणी बाहेर काढले, अशी धारणा आहे. त्या दिवसांत भृगू ऋषी याच मार्गावरून हिमालयाच्या प्रवासास आले होते. तपश्चर्येसाठी माघार घेण्याच्या शोधात असतानाच त्यांनी बाबा अमरनाथच्या पवित्र गुहेचे दर्शन घेतले. त्यामुळे भृगू मुनी हे अमरनाथ गुहेला भेट देणारे पहिले व्यक्ती होते. तेव्हापासून श्रावण महिन्यात (जुलै-ऑगस्ट) लाखो भाविक या पवित्र गुहेला भेट देऊ लागले. पवित्र अमरनाथ गुहेच्या अस्तित्वाचा पुराणात उल्लेख आहे. पण, 1850 मध्ये बुटा मलिक नावाच्या मेंढपाळाने अमरनाथ गुहा पुन्हा शोधून काढली, अशीही एक कथा प्रचलित आहे.
यात्रामार्ग
अमरनाथ यात्रेला जाण्यासाठी पहलगाम आणि बालटाल असे दोन मुख्य मार्ग आहेत. पहलगाम हे अमरनाथ यात्रेचे बेस पॅम्प असून तेथून प्रवासी अमरनाथ गुहेकडे जाण्यास सुऊवात करतात. रस्तामार्गाने जाण्यासाठी सुरुवातीला जम्मूला जावे लागेल. त्यानंतर जम्मू ते श्रीनगर असा प्रवास करावा लागेल. येथून पहलगाम किंवा बालटालच्या कोणत्याही ठिकाणाहून भाविक प्रवास सुरू करू शकतात. येथून अमरनाथ गुहेचे अंतर सुमारे 91 ते 92 किमी आहे.

बालटाल मार्गापासून अमरनाथ गुहेचे अंतर फक्त 14 किमी आहे. पण उभ्या पायऱ्यांमुळे हा मार्ग बऱ्यापैकी अवघड आहे. पण साहसी आणि जोखीम पत्करण्याची आवड असलेले लोक या मार्गावरून प्रवास करणे पसंत करतात. या मार्गावरून जाणारे लोक स्वत:च्या जबाबदारीवर प्रवास करतात. वाटेत कोणतीही अनुचित घटना घडल्यास भारत सरकार कोणतीही जबाबदारी घेत नाही. पहलगाम मार्गाने गेल्यास अमरनाथ गुहेपर्यंत पोहोचण्यासाठी तीन दिवस लागतात. येथून गुहेचे अंतर सुमारे 48-50 किमी आहे. पण अमरनाथ यात्रेचा हा खूप जुना व सुकर मार्ग आहे.
पहलगाम ते पवित्र गुहेपर्यंतचा मार्ग हा जगातील सर्वात सुंदर पर्वतरांगांचा मार्ग आहे. यात हिमनगाच्या दऱ्या, उंचावरून कोसळणारे धबधबे, बर्फाच्छादित तलाव, त्यातून बाहेर पडणारे झरे असा खडतर प्रवास असला तरी भाविकांना आनंददायी वाटतो. येथे जाताना काही श्रीमंत लोक खेचरांवरून प्रवास करतात. तर बरेचजण पायी जातात. अपंग आणि वृद्धांसाठी राईड्सची व्यवस्थाही उपलब्ध आहे. पहलगाम हे एक प्रसिद्ध पर्यटनस्थळही आहे. या ठिकाणचे नैसर्गिक सौंदर्य खुलून दिसते. पहलगामला जाण्यासाठी जम्मू-काश्मीर पर्यटन केंद्रातून सरकारी बसेस उपलब्ध आहेत.
नोंदणीची प्रक्रिया
अमरनाथ यात्रेसाठी नोंदणी आणि प्रवास परवाना ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्वावर उपलब्ध आहे. एका प्रवासी परवान्यासह फक्त एकजण प्रवास करू शकतो. प्रत्येक नोंदणी शाखेला प्रवाशांची नोंदणी करण्यासाठी ठराविक दिवस आणि मार्ग दिलेला असतो. प्रत्येक मार्गावरील भाविकांची संख्या नोंदणी कक्षाकडून ठरवली जाते. नोंदणी आणि आरोग्य प्रमाणपत्रासाठीचे फॉर्म ऑनलाईन उपलब्ध असतात. प्रवासी परवान्यासाठी अर्ज करताना भाविकांकडे आरोग्य प्रमाणपत्र, चार पासपोर्ट आकाराचे फोटो सोबत ठेवणे आवश्यक आहे. अमरनाथ यात्रेसाठी नोंदणी अधिकारी बालटाल आणि पहलगामसाठी वेगवेगळ्या रंगाचे प्रवासी परवाने देतात. या परवानग्यांचा रंगही प्रत्येक दिवसासाठी वेगळा असतो.
वैद्यकीय चाचण्या अत्यावश्यक
2014 पासून अमरनाथ यात्रेकरुंना वैद्यकीय तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. अमरनाथ श्राईन बोर्डाच्या डॉक्टरांनी लिहून दिलेले वैद्यकीय प्रमाणपत्र दाखविल्याशिवाय यात्रेत सहभागी होता येत नाही. हेलिकॉप्टरच्या
प्रवासासाठीही भाविकांना आरोग्य प्रमाणपत्र दाखवावे लागते. प्रवासादरम्यान
प्रवाशांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी अमरनाथ यात्रेपूर्वी डॉक्टरांनी काही आवश्यक वैद्यकीय चाचण्या करण्याची शिफारस केली आहे. यामध्ये रक्ताचे विकार, सांधेदुखी, उच्च रक्तदाब, दमा, गर्भधारणा, मधुमेह, नर्व्हस ब्र्रेकडाऊन हे
प्रमुख आहेत.
यात्रा रद्द-कारणे
2016: काश्मीर अशांतता
काश्मीरमधील अशांततेमुळे जुलै 2016 मध्ये यात्रेला स्थगिती दिली होती. काही सुफी आणि शियांनी नंतर यात्रा पुन्हा सुरू करण्याची मागणी केली.
2019: हल्ल्याचा धोका
राज्य सरकारने संभाव्य दहशतवादी हल्ल्यांचा धोका असल्याचे सांगितल्यानंतर ऑगस्ट 2019 मध्ये तीर्थयात्रा स्थगित करण्यात आली होती.
2020-21: कोरोना महामारी
कोविड-19 साथीच्या आजारामुळे अमरनाथ श्राईन बोर्डाने 2020 आणि 2021 मध्ये वार्षिक तीर्थयात्रा रद्द केली होती.
2022: हिमस्खलनामुळे तात्पुरते निलंबन
8 जुलै 2022 रोजी हिमस्खलनानंतर आलेल्या पुरामुळे अमरनाथ यात्रा 3 दिवस थांबविण्यात आली होती. या दुर्घटनेत किमान 16 लोक ठार झाले, तर 40 हून अधिक बेपत्ता झाले. तसेच सुमारे 15000 यात्रेकरू अमरनाथ पवित्र गुहेजवळ अडकून पडले होते.
स्वप्नवत प्रवास
अमरनाथ यात्रेदरम्यान यात्रेकरुंच्या सोईसाठी सर्व शक्य व्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. अमरनाथ श्राईन बोर्डाचे अधिकारी भाविकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी परिश्र्रम घेत आहेत. जगभरातील लाखो भाविकांसाठी बाबा अमरनाथच्या पवित्र गुहेला भेट देणे हे स्वप्नासारखे आहे. एकंदर अमरनाथ, अमरेश्वर इत्यादी नावांनी ओळखल्या जाणाऱ्या भगवान शिवाच्या स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन भाविकांना सुखावणारे आहे. अनेक अडथळे पार करून अमरनाथ गुहेपर्यंत पोहोचणे हे सोपे काम नसल्यामुळे गुहेतील हिमलिंग पाहणारा प्रत्येक भाविक स्वत:ला धन्य आणि भाग्यवान समजतो.
जयनारायण गवस









