दादरमधील शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास उच्च न्यायालयाकडून मिळालेली परवानगी ही शिवसेनेसाठी खऱया अर्थाने ‘विजया’दशमी म्हटली पाहिजे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे कारण देत मुंबई महापालिकेकडून सेनेच्या या मेळाव्यास परवानगी नाकारण्यात आली होती. किंबहुना हा अधिकारांचा दुरुपयोग असल्याचे ताशेरे ओढत सदर निर्णय न्यायालयाकडून रद्द करण्यात आला आहे. शिंदे गटाकरिता ही सणसणीत चपराकच म्हणायला हवी. शिवाजी पार्क आणि शिवसेनेचा दसरा मेळावा हे मागच्या अनेक दशकांपासूनचे समीकरण आहे. या मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ज्वलंत विचार ऐकण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱयातील शिवसैनिक गर्दी करीत असत. त्यानंतर बाळासाहेबांचे उत्तराधिकारी म्हणून उद्धव ठाकरे हेच दसरा मेळाव्यास संबोधित करत असतात. कोरोना वा पावसाचा एखाद दुसरा अपवाद वगळता दसरा मेळावा, त्याचे स्थळ, यात कधी खंड पडला नाही. परंतु, दोन महिन्यांपूर्वीचा महाराष्ट्रातील राजकीय भूकंप, सेनेतील अभूतपूर्व फूट, मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे यांची झालेली निवड, त्यातून बंडखोर गटाने खरी शिवसेना आमचीच असल्याचा केलेला दावा या सगळय़ा नाटय़मय घटनांमुळे दसरा मेळाव्याचे काय होणार, असा प्रश्न उपस्थित झाला होता. सेनेच्या वतीने दसरा मेळाव्याकरिता शिवाजी पार्क उपलब्ध व्हावे, यासाठी 22 आणि 26 ऑगस्ट रोजी रितसर अर्ज करण्यात आला होता. तर बंडखोर शिंदे गटाच्या आमदार सदा सरवणकर यांनीही त्याकरिता 30 ऑगस्टला अर्ज केला होता. वास्तविक प्रथम अर्ज करणाऱयास प्राधान्य, या न्यायाने शिवसेनेस मैदान मिळणे, केव्हाही न्यायाचित ठरले असते. परंतु, पालिका प्रशासनास साधारण महिनाभरातही त्यावर निर्णय घेण्यास सवड मिळाली नाही, यातूनच खरी गोम लक्षात येते. तिकडे एमएमआरडीएअंतर्गत असलेल्या बीकेसी मैदानासाठी शिंदे गटाने केलेला अर्ज एका बाजूला लगोलग संमत होतो, तथापि त्याकरिता सेनेने केलेला अर्ज फेटाळला जातो. या सगळय़ाच गोष्टी तशा अनाकलनीय म्हणाव्या लागतील. अर्थात हे न समजण्याइतपत जनता दुधखुळी राहिलेली नाही. आता न्यायदेवतेनेच हा अप्रामाणिकपणा उघड केला, हे बरे झाले. तरी त्यातून शिंदे गटाचे डोळे उघडतील, असे मानण्याचे कारण नाही. आपणच खरी शिवसेना आहोत, हे सिद्ध करण्यासाठी जिथे रोखता येईल, तिथे सेनेला रोखायचे, हीच त्यांची रणनीती दिसते. मात्र, यातून स्वतःचे अस्तित्व सिद्ध कसे होणार? आपले राष्ट्र लोकशाहीप्रधान आहे. येथे प्रत्येक पक्षाला सभा, मेळावे घेण्याचे स्वातंत्र्य आहे. हे ध्यानात घेऊन शिंदे गटाने उदारमतवादी दृष्टीकोन ठेवायला हवा होता. पण ठाकरेंचा मेळावा होऊ नये, याकरिताच त्यांनी आपली बरीचशी शक्ती घालविली. ही मानसिकता म्हणजे शर्यतीत प्रथम क्रमांक पटकाविण्यासाठी प्रतिस्पर्ध्याला स्पर्धेत भाग घेऊ न देण्यासारखेच होय. अर्थात मेळावाच घेऊ द्यायचा नाही, हा दुराग्रह अंतिमतः या गटालाच मारक ठरला असून, यातून जनसहानुभूती प्रामुख्याने पुन्हा एकदा ठाकरेंच्या बाजूला वळल्याचे पहायला मिळते. उद्धव यांची न्यायालयाच्या निर्णयानंतरची प्रतिक्रियाही संयत होय. वाजतगाजत, पण शिस्तीत या. कुठेही गालबोट लावू नका, असे त्यांनी सैनिकांना बजावले आहे. यातून बंडखोरांनी शिकावे. आपला सुसंस्कृतपणा दाखवून द्यावा. विशेषतः कोकणातील भाईंनी आपल्या भाषेत सुधारणा करायला हवी. कणकवलीतील प्रतिभावंतांनीही आपल्या प्रतिभेला आवर घालायला हवा. या मंत्रीपुत्राची विरोधकांबद्दलची विशेषणे, म्याँव म्याँव, अशी हेटाळणी करणे, या गोष्टींतून वास्तविक त्यांच्यातीलच उथळपणाचे प्रकर्षाने दर्शन घडते, हे त्यांना कधी समजणार, हे देव जाणे. त्यामुळे पक्ष नेतृत्वानेच पुढाकार घेऊन त्यांना कसे बोलावे, याचे धडे देणे श्रेयस्कर ठरेल. अन्यथा, असा बेतालपणा सेनेच्याच पथ्यावर पडू शकतो. दसरा मेळाव्याच्या मुद्दय़ावर शिंदे गट सर्वौच्च न्यायालयात जाणार असल्याचे बोलले जाते. तो झाला त्यांचा प्रश्न. दुसऱया बाजूला शिंदे गटाच्या मेळाव्याचीही जोरदार तयारी होत असून, राज्यभरातून विक्रमी गर्दी जमविण्याचे प्रयत्न दिसतात. मात्र, सेनेवरील प्रभुत्वासाठी निव्वळ गर्दीपेक्षा दर्दी महत्त्वाचे असतील. कारण तेच टिकाऊ असून, ते कुणाकडे असतील, यावर पुढचा खेळ अवलंबून असेल. शिंदे यांच्यामागे महाशक्ती आहे. ही महाशक्ती, त्यांचे नेते सत्तेत सोबत असणे आणि मेळाव्यात झळकणे, यात फरक आहे. तसे ते मेळाव्यास्थळी ठसठशीतपणे झळकले, तर त्याचा उलटा परिणामही संभवतो. हा सेनेचा मेळावा कसा, असा प्रश्न उपस्थित झाल्यास त्याचे उत्तर देणे सोपे नसेल. आधीच प्रॉम्टिंगच्या मुद्दय़ावर मुख्यमंत्री शिंदे टीकेचे धनी होत आहेत. भाजप नेते किती वेळा मदतीला धावणार? त्यामुळे शिंदेंनी अभ्यास करावा, आत्मनिर्भर व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त होते. ती चुकीची कशी? बंडखोर आमदार म्हणतात त्याप्रमाणे ते 18 तास काम करीत असतीलही. पण, त्यांचा म्हणून प्रभाव पडायला हवा. मेळाव्यात तर ते आवश्यकच. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने आमनेसामने येणाऱया सेना व शिंदे गटातील लढाई मुंबई महापालिका निवडणुकीपर्यंत टीपेला पोहोचलेली असेल, हे वेगळे सांगायला नको. शिंदे गटाला सोबत घेत मुंबई मनपा हिसकाविण्याचा चंगच भाजपाने बांधला आहे. त्यामुळे मनपा निवडणूक चुरशीची होईल. फॉक्सकॉन गुजरातला नेण्यासह मराठीचा मुद्दा या निवडणुकीत कळीचा ठरू शकतो. दुफळीने शक्तिक्षय झाल्यानंतर नवी समीकरणे जुळविण्यावर सेनेने भर दिला असून, आपली प्रतिमा सर्वसमावेशक करण्यातही उद्धव यांनी यश मिळविले आहे. अर्थात त्यांच्यापुढची न्यायालयीन व राजकीय आव्हानेही भली मोठी आहेत. हे शिवधनुष्य ते कसे पेलणार, हे येणारा काळच सांगेल.
Previous Articleकुबुद्धी
Next Article हातीचे न संडावे देवे । शरण आलो जीवेभावे ।।
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








