दोडामार्ग – वार्ताहर
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षातील वरिष्ठ पदाधिकारी हे इतर पक्षांशी हातमिळवणी करून आपल्या पक्षाची गद्दारी करतात. येणाऱ्या जि. प. व पं. स. निवडणुकीतही हेच होणार आहे असा गौप्यस्फोट उबाठा शिवसेनेचे तालुका उपसंघटक संदेश वरक यांनी करत आपल्या पदाचा राजीनामा लेखी स्वरूपात जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी व तालुकाप्रमुख संजय गवस यांच्याकडे सादर केला आहे. संदेश वरक यांनी दिलेल्या राजीनामा पत्रात म्हटले की, गेल्या लोकसभा व विधानसभेच्या मतदानावेळी आमचे वरिष्ठ पदाधिकारी इतर पक्षांना ‘मेनेज’ झालेले असतात. आता येवू घातलेल्या जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुकांवेळी हेच होणार आहे. त्यामुळे आपण आपल्या पदाला न्याय देऊ शकत नाही. व लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. येणाऱ्या निवडणुकांत फक्त प्रचार करायचा आणि आपले वरिष्ठ पदाधिकारी हे दुसऱ्या पक्षांच्या उमेदवारांचे अंतर्गत काम करत राहणार हे आपल्याला पटत नाही. त्यामुळे आमचे उमेदवार पराभूत होत राहणार हेच खर आहे. त्यामुळे आपण आपल्या पदाचा राजीनामा देत आहे असेही वरक यांनी म्हटले आहे. मात्र असे असले तरी आपण जिवंत असेपर्यंत प्रामाणिक उबाठा शिवसेना पक्षाचे काम करत राहणार आहे हेही त्यांनी सांगितले.
इतर पक्षांचे काम करणारे ते पदाधिकारी कोण ?
संदेश वरक यांनी केलेल्या गौप्यस्फोटाप्रमाणे उबाठा पक्षाच्या लेबलखाली काम करत असतात आणि निवडणुकीवेळी मात्र इतर पक्षाचे काम करतात हे नक्की वरिष्ठ पदाधिकारी कोण आहेत ? हा प्रश्न आता तालुकावासियांनामध्ये चर्चेचा विषय बनला आहे.









