ऑनलाईन टीम/तरुण भारत
कालच्या बैठकीत माझ्यावर कोणताही दबाव नव्हता. पण माझे शिवसेनेचे जे काही लोक आहेत जे अधिवासी लोकांसाठी काम करतात त्यांनी मला विनंती केली की आपण एक आदिवासी महिला जी पहिल्यांदा देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होणार आहे, त्यासाठी आपण त्यांना पाठिंबा द्यावा. त्यामुळे त्यांच्या विनंतीचा विचार, त्यांच्या भावनांचा आदर करून आम्ही द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी पाठिंबा देत आहे, असे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जाहीर केले. मुंबई येथे आज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
सध्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची जय्यद तयारी सुरू आहे. एनडीएकडून द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे शिवसेना नक्की कोणाला पाठिंबा देणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते. त्यासंदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. शिवसेना द्रौपदी मुर्मू यांनाच पाठिंबा देणार असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.
दरम्यान, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी अनेकजण भेटले होते. शिवसेनेतील नेते, खासदार, आमदारकीसाठी उभे राहिलेले उमेदवार, आदिवासी समाजातील पदाधिकारी, शिवसैनिक यांनी प्रत्यक्ष भेटून द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी केली होती. तसेच, शिवाजीराव ढवळे यांनीही विनंती केली होती. राज्यसभेसाठी उमेदवारी दिलेलेआमशा पाडवी, पालघर जिल्हा परिषदेतील निर्मला गावित यांनीही भेटून द्रौपदी मुर्मू यांनाच पाठिंबा दर्शवा अशी विनंती केली. तसेच, आदिवासीच नव्हे एसटी, एनटी समाजातील लोकांनीही द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे देशाच्या सर्वोच्च पदी आदिवासी समाजातील महिलेला संधी मिळावी याकरता द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दर्शवताना आम्हाला आनंद होईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
हे ही वाचा : शिवसेना द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देणार; संजय राऊतांचे संकेत
शिवसेनेची परंपरा
आम्ही एनडीएत असतानाही प्रतिभाताई पाटील, प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिला होता. प्रतिभाताई पाटील या महाराष्ट्रातील पहिला महिला आहेत ज्या राष्ट्रपती पदाच्या खुर्चीवर बसल्या. त्यामुळे शिवसेनेला असे निर्णय घेण्याची परंपरा आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, भाजप आणि शिवसेना यांचे संबंध ताणले गेले असताना शिवसेनेच्या खासदारांनी ठाकरे यांच्यावर मुर्मू यांना पाठिंबा देण्यासाठी दबाव आणला होता. मुर्मू या आदिवासी समाजाच्या महिला आहेत. मुर्मू आणि यशवंत सिन्हा यांची तुलना करता मुर्मू यांनाच पाठिंबा देणे उचित ठरेल, असं स्पष्ट मत खासदारांनी व्यक्त केलं आहे, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज सकाळीच स्पष्ट केलं होतं.
हे हा वाचा : गुजरात एटीएसची मोठी कारवाई, मुंद्रा बंदरातून ३५० कोटीचे ड्रग्ज जप्त