शिंदे गटातील बंडखोर आमदारांनी बंड करताना सातत्याने राष्ट्रवादीकडून सापत्न वागणूक मिळाल्याचा आरोप केला व उध्दव ठाकरे यांनी आमच्यापेक्षा राष्ट्रवादीच्या आमदारांची आणि नेत्यांची मर्जी सांभाळल्याचा आरोप या बंडखोर आमदारांनी केला. त्याच राष्ट्रवादीकडून आता उध्दव ठाकरेंच्या निर्णयाबाबत स्वतः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार बोलल्याने आता शिवसेनेला भाजप, शिंदे गट आणि राष्ट्रवादीशीही भविष्यात सामना करावा लागणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. त्यातच राष्ट्रपतीपद निवडणुकीच्या पाठिंब्यावरुन शिवसेना खासदार फुटीच्या उंबरठय़ावर आहे. त्यामुळे उध्दव ठाकरेंसमोर सध्या तरी आमदारांनंतर आता खासदार सांभाळण्याचे मोठे आव्हान असताना दुसरीकडे राज्यात सत्तेत असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडी विरोधात जाऊन राष्ट्रपती निवडणुकीबाबत निर्णय घ्यावा लागण्याची सध्या तरी शक्यता आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी संभाजीनगर (औरंगाबाद) येथे बोलताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सरकारने शेवटच्या मंत्रीमंडळ बैठकीत औरंगाबाद नामांतराच्या घेतलेल्या निर्णयाबाबत आमच्याशी कुठलाही संवाद झालेला नसल्याचा आरोप केला, तसेच शिवसेनेतील यापूर्वीचे बंड पाहता शिंदेंच्या बंडात शिवसेनेने लक्ष घातलेले दिसत नसल्याचे विधान केले याचाच दुसरा अर्थ असा की या बंडाला अप्रत्यक्ष उध्दव ठाकरेंचा पाठिंबा होता असे होऊ शकतो. त्यामुळे आता राष्ट्रवादीकडूनही उध्दव ठाकरे यांच्यावर आरोप होऊ लागल्याने शिवसेनेसमोर आता भाजप, एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी यांचा सामना करावा लागणार आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर पहिल्यांदा शरद पवार यांनी हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असल्याचे म्हटले होते, मात्र त्यानंतर काही तासातच पवारांनी हे बंड मोडून काढण्यासाठी सर्व सूत्रे आपल्या हातात घेतली आणि एकीकडे अजित पवार यांनी या बंडाचा आणि भाजपचा काही संबंध नसल्याचे सांगितल्यानंतर काही मिनिटात शरद पवारांनी थेट सुरत आणि गुवाहाटी येथील स्थानिक भाजप या बंडात सामील असल्याचे सांगितले. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी सातत्याने राष्ट्रवादीने स्थानिक पातळीवर आम्हाला कसे संपवण्याचा प्रयत्न केला हे सांगितले. प्रत्येकाने राष्ट्रवादीवर आरोप केल्यानंतर त्यात भरीस भर म्हणून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीदेखील राष्ट्रवादीकडून काँग्रेसला निधी मिळत नसल्याचा आरोप केला. त्यामुळे राष्ट्रवादीवर सातत्याने झालेले आरोप लक्षात घेता राष्ट्रवादीच्या विश्वासार्हतेबाबतच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादीवर कधी नव्हे इतके आरोप या बंडाच्या दरम्यान झाले. आता राष्ट्रवादीकडूनही शिवसेनेला टार्गेट केले जाऊ शकते हे पवारांच्या कालच्या विधानावरुन समजते.
शिवसेनेचे चिन्ह असलेल्या धनुष्यबाण चिन्हाबाबत कोणताही निर्णय निवडणूक आयोगाने घेऊ नये, कोणताही निर्णय घेण्याआधी आमची बाजू ऐकून घ्यावी, अशी विनंती शिवसेनेकडून निवडणूक आयोगाला केली असून शिवसेना नेमकी कुणाची आणि कोण बेकायदेशीर हा वाद सध्या कोर्टात पोहोचला आहे. सुप्रीम कोर्टात सोमवारी सुनावणी पार पडली आहे. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला तूर्तास स्थगिती दिली आहे. तर शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी बजावलेल्या अपात्रतेच्या नोटिसीच्या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांना या प्रकरणी सुनावणी पूर्ण होईपर्यंत बंडखोर आमदारांवर कोणतीही कारवाई न करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे न्यायालयात एकनाथ शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाल्यामुळे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोरच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.
दुसरीकडे राष्ट्रपती पदाच्या भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेने पाठिंबा द्यावा, यासाठी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे, राजेंद्र गावित यांनी पाठिंबा देण्याची विनंती पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना केली आहे, त्यातच शिवसेनेचे खासदार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यासाठी 19पैकी 14 खासदार लोकसभेत स्वतंत्र गट स्थापन करणार असल्याचे सांगितले जाते. राष्ट्रीय लोकशाही आघाडीत राहूनही वेगळी भूमिका घेणाऱया शिवसेनेने आता एनडीएशी फारकत घेतली आहे. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससमवेत महाविकास आघाडी केली असली तरी, शिवसेना ही संयुक्त पुरोगामी आघाडीत (युपीएत) सहभागी झालेली नाही. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरुद्ध भूमिका घेऊन द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर करतील आणि कथित बंडखोरीच्या तयारीत असलेल्या खासदारांनाही धक्का देतील, अशी दाट शक्यता आहे. यापूर्वी 2007च्या राष्ट्रपती निवडणुकीच्या वेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (युपीए) उमेदवार प्रतिभाताई पाटील यांना तर 2012मध्ये राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने पुन्हा एकदा प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे आता उध्दव ठाकरेंनी भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यास नाराज खासदारांची नाराजी दूर करता येईल तसेच भविष्यात शिवसेना व भाजप एकत्र येण्याची दाट शक्यता निर्माण होऊ शकते. शिवसेना खासदारांच्या सोमवारी झालेल्या बैठकीला 19 पैकी 15 खासदारांनी भाजप उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना आदिवासी महिला उमेदवार म्हणून पाठिंबा देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना खासदारांची बंडखोरी रोखण्यासाठी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजप उमेदवाराला पाठिंबा देण्याबाबत निर्णय घ्यावा लागेल अन्यथा सेनेचे 12 खासदार हे शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा दावा वारंवार केला जात आहे. जर ठाकरेंनी भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यास राज्यातीलही राजकीय समीकरणे भविष्यात बदलू शकतात. त्यामुळे उध्दव ठाकरेंच्या निर्णयाकडे सगळ्य़ांचे लक्ष लागले आहे.
प्रवीण काळे








