शिंदे गटाला एक किंवा दोन मंत्रिपदे मिळण्याची शक्यता
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्रीय मंत्रिमंडळात काही प्रमाणात परिवर्तन होण्याची शक्यता आहे. काही विद्यमान मंत्र्यांना पक्षकार्यासाठी मोकळे करण्यात येणार असून काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. याच प्रक्रियेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेलाही एक किंवा दोन मंत्रिपदे देण्यात येण्याचीही शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाने राष्ट्रीय लोकशाही आघाडी बळकट करण्याकडे लक्ष पुरविले आहे. त्यामुळे ही आघाडी सोडून गेलेल्या पक्षांना पुन्हा जवळ करण्यात येत असल्याचे दिसून येते. तसेच जे नवे पक्ष किंवा गट आघाडीत नव्याने आले आहेत, त्यांच्या प्रतिनिधींनाही केंद्रीय मंत्रिमंडळात सामावून घेण्याचा उद्देशाने मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार अशी चर्चा आहे.
शिवसेनेचे महत्व
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांची शिवसेना हे केंद्राच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहेत. महाराष्ट्रातील सेना-भाजप युती सरकारला आता एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाला असून महाराष्ट्रातील पुढच्या लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेनेशी युती आवश्यक आहे. याच उद्देशाने शिवसेनेला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार आहे, असे बोलले जाते. शिंदेनाही केंद्रातील भाजप-रालोआ सरकारच्या सहकार्याची आवश्यकता आहे.









