हुपरी,वार्ताहर
Kolhapur : भाजपा सरकारच्या फसव्या योजनांची जनतेसमोर पोलखोल करण्यासाठी शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने हातकणंगले लोकसभा मतदासंघांत दोन टप्यात ‘होऊ दे चर्चा’ अभियान राबविण्यात येणार असून जनतेची दिशाभूल करणाऱ्या राज्य व केंद्र सरकारविरोधात प्रत्येक विधानसभा मतदारसघांत गावोगावी या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.सामान्य जनतेमध्ये सरकारच्या बोलघेवड्या योजनांबद्दल असणाऱ्या रोषाला जागृत करण्याच्या उद्देशाने हे अभियान राज्यभर राबविले जाणार आहे.त्याचाच भाग म्हणून पहिल्या टप्प्यातील अभियानाची सुरुवात १२ सप्टेंबर पासून शाहूवाडी तालुक्यातून करण्यात येणार असून शिवसेना -उद्धव बाळासाहेब ठाकरे उपनेत्या ज्योतीताई ठाकरे व संजना घाडी प्रमुख उपस्थित असणार आहेत,अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी दिली.हुपरी (ता.हातकणंगले) येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ‘होऊ दे चर्चा’ अभियानाच्या तयारीसाठी आयोजित केलेल्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत ते बोलत होते.
भाजपने दिलेली आश्वासने तुमच्यापर्यंत पोहोचली काय ? अशी लोकांना विचारणा करून त्यांच्याच माध्यमातून सत्ताधाऱ्यांचा खोटारडेपणा उघड केला जाणार आहे. दुसरीकडे पेट्रोल, डिझेल, सिलिंडर,अन्नधान्य, भाजीपाल्यासह दैनंदिन गरजांच्या वस्तूंच्या सध्या वाढलेल्या आणि आधीच्या किंमतीचे कोष्टकच लोकांसमोर या अभियानातून ठेवण्यात येणार आहे. भाजप सत्तेवर येण्यापूर्वी ६०० रुपयांत सिलिंडर मिळत होते, परंतू ते आता १२०० रुपयांना मिळते. पेट्रोल ६० रुपये होते, ते आता ११२ रुपयांना मिळत आहे. याकडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष वेधले जाणार आहे.सरकारच्या योजनांचा भांडाफोड करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या होऊ दे चर्चा अभियानात हातकणंगले लोकसभा मतदासंघांतील तमाम शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी यावेळी केले.
बैठकीस उपजिल्हाप्रमुख साताप्पा भवान,मधुकर पाटील,महादेव गौड,नामदेव गिरी,महिला आघाडी जिल्हा संघटिका मंगल चव्हाण,तालुकाप्रमुख वैभव उगळे,आनंदा शेट्टी,बाजीराव पाटील,दत्ता पोवार,बाबासो पाटील,युवासेना जिल्हाधिकारी स्वप्नील मगदूम,विभागप्रमुख विनायक विभूते,राजेंद्र पाटील,संजय वाईंगडे,नगरसेवक बाळासाहेब मुधाळे,प्रमोद सूर्यवंशी ,शिवाजी जाधव, यांच्यासह पदाधिकारी होते.









