खासदार संजय राऊत, जयंत पाटील घेणार प्रचारसभा : सीमावासियांमध्ये उत्साहाचे वातावरण
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बेळगावमध्ये येणार आहेत. याबरोबरच शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाचे इतर नेतेही प्रचारासाठी बेळगावमध्ये येतील, असे सांगण्यात आल्याने सीमाभागात उत्साहाचे वातावरण असून म. ए. समितीचे उमेदवार निश्चितच विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. मध्यवर्ती म. ए. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी व सोमवारी मुंबई येथे जाऊन महाराष्ट्रातील नेत्यांच्या भेटी घेतल्या. प्रारंभी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेऊन सीमाप्रश्नाचा खटला, त्याचबरोबर होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीविषयी चर्चा करण्यात आली. यावेळी जयंत पाटील यांनी आपण दोन दिवस प्रचारासाठी बेळगावमध्ये येऊ, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचीही भेट घेत विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी त्यांना आमंत्रण देण्यात आले. शिवसेना पक्ष नेहमीच सीमावासियांच्या पाठीशी उभा राहिला असून यावेळी सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीसाठी पोषक वातावरण असल्याने आपण प्रचारासाठी दोन दिवस हजर राहू, असे आश्वासन त्यांनी दिले. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संजय राऊत उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
शरद पवार यांची घेतली भेट
यावेळच्या विधानसभा निवडणुकीसाठी म. ए. समितीने एकी करत बेळगाव उत्तर, दक्षिण, ग्रामीण, खानापूर व यमकनमर्डी या ठिकाणी उमेदवार दिले आहेत. राष्ट्रीय पक्षांकडून मराठी भाषिकांची होत असणारी गळचेपी लक्षात घेऊन यावेळी समितीच्या उमेदवारांना मतदान होणार आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यांनी राष्ट्रवादीचे आणखी दोन ते तीन नेते प्रचारासाठी पाठवून देऊ, असे सांगितले. यावेळी मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे, अॅड. एम. जी. पाटील, विनोद आंबेवाडकर उपस्थित होते.









