पुढील सुनावणी 18 जुलैला
बेळगाव : महानगरपालिकेसमोर लालपिवळा ध्वज लावण्यात आल्याने या घटनेचा निषेध करत शिवसेना नेते विजय देवणे यांच्यासह पाच जणांनी कोनेवाडी गावात भगवा ध्वज फडकावून ‘जय महाराष्ट्र’ अशी घोषणा दिली होती. त्यामुळे याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेऊन न्यायालयात दोषारोप दाखल केला आहे. सदर खटल्यातील पाच जणांना न्यायालयाने वॉरंट जारी केले असून सोमवारी शिवसेना नेते विजय देवणे हे बेळगाव न्यायालयात हजर झाले. त्यामुळे न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. या खटल्याची पुढील सुनावणी 18 जुलै रोजी होणार आहे.
बेळगाव महानगरपालिकेसमोर बेकायदेशीररीत्या लालपिवळा ध्वज लावण्यात आल्यानंतर या घटनेचा निषेध करण्यासाठी 21 जानेवारी 2021 रोजी शिवसेना नेते विजय देवणे, संग्रामसिंह कुप्पेकर-देसाई, सुनील शिंत्रे, अमृत जत्ती, संतोष मळवीकर हे बेळगाव तालुक्यातील कोनेवाडी गावात दाखल झाले. त्या ठिकाणी त्यांनी भगवा ध्वज फडकावून महाराष्ट्राच्या घोषणा दिल्या. तसेच तेथील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. यामुळे मराठी व कन्नड भाषिकांत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. न्यायालयात दोषारोप दाखल केल्याने या खटल्याची सुनावणी चौथे जेएमएफसी न्यायालयात सुरू आहे.
न्यायालयाच्या सुनावणीला सातत्याने वरील सर्वजण गैरहजर राहिल्याने वॉरंट बजाविण्यात आले होते. त्यानुसार विजय देवणे सोमवारी न्यायालयासमोर हजर झाले. त्यामुळे न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. आता या खटल्याची पुढील सुनावणी 18 जुलै रोजी होणार असून सर्वांच्यावतीने अॅड. शामसुंदर पत्तार, अॅड. हेमराज बेंच्चण्णावर काम पहात आहेत. यावेळी शिवसेना बेळगाव जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, नगरसेवक रवी साळुंखे, माजी नगरसेवक मनोहर हलगेकर, महेश टंकसाळी, तालुका प्रमुख सचिन गोरले, रमेश माळवी आदी उपस्थित होते.









