तालुक्यातील शिवसैनिकांचे खच्चीकरण
हातकणंगले /बाबुराव जाधव
हातकणंगले तालुक्यात शिवसेनेला मोठय़ा प्रमाणात मरगळ आली आहे. नेतेमंडळींनी सोयीस्कर राजकारणाकडे पाहिल्याने कार्यकर्ते हवालदील झाले आहेत. एकंदरीतच शिवसेना हा तळागाळात रुजलेला पक्ष असूनही पक्षातच पडलेली सरळ फूट पाहता तालुक्यात शिवैनिकांमध्ये पूर्णतः उदासीनता पसरली आहे.
एकेकाळी कट्टर हिंदुत्व व जहाल विचारसरणीने प्रेरित शिवसेनेत नेहमीच एकी असायची. ‘मातोश्री’वरून येणारा आदेश हा अंतिम मानून सर्व शिवसैनिक तयारीला लागायचे. मात्र हातकणंगले तालुक्यात शिवसेनेमध्ये जिल्हाध्यक्ष व माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर असे दोन गट पडल्याने आधीच कमकुवत झालेली शिवसेना आता पक्षातच मोठी फूट पडल्याने अधिकच कमकुवत होत आहे.
दहा वर्षे हातकणंगले मतदारसंघातून माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी पक्षाच्या चिन्हावर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. मात्र पक्षांतर्गत गटबाजीचा फटका निवडणुकीमध्ये त्यांना बसला व अल्पमतात पराभव स्वीकारावा लागला. अनेकवेळा प्रयत्न करूनही पक्षांतर्गत गटबाजी वरिष्ठ नेतेमंडळींना मिटवता आली नसल्याने हा पराभव झाल्याची चर्चा मतदारसंघात आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांनी थोडय़ाफार प्रमाणात ही गटबाजी संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला. त्याचा त्यांना फायदा होत जवळपास लाखाच्या मताधिक्याने त्यांनी लोकसभेला विजय संपादीत केला. कालांतराने विधानसभेवेळी मात्र परत ही गटबाजी उफाळून आल्याने मिणचेकरांना पराभव स्वीकारावा लागला.
शिवसेनेतील गटबाजीमुळे विद्यमान लोकप्रतिनिधी, नेतेमंडळींनी आपल्या सोयीचे राजकारण करण्यास सुरूवात केल्याने तळागाळातील शिवसैनिक हवालदिल झाला आहे. तालुक्यात एकूणच मोठय़ा प्रमाणावर गल्लीबोळात शिवसैनिक पाहावयास मिळत होता. मात्र आता त्यांचे नेत्यांचे धोरण निश्चित नसल्याने शिवसैनिकांचे खच्चीकरण झाले आहे.
हातकणंगलेच्या भौगोलिक परिस्थितीनुसार वडगाव शहरानजीक मोठय़ा प्रमाणावर पूर्वीपासूनच शिवसेनेचे प्रबळ मतदार होते. मात्र यातही गट पडल्याने गत निवडणुकीत संदीप दबडे यांनी अपक्ष अर्ज भरला. याचवेळी जिल्हाध्यक्ष मुरलीधर जाधव यांची विचारसरणी घेऊन एक वेगळाच गट मतदारसंघात कार्यरत आहे. हुपरी परिसरामध्ये भारतीय जनता पक्षाने आपले जाळे भक्कमपणे रुजवले आहे. त्याचा फटकाही शिवसेनेला बसला आहे. पुलाची शिरोलीमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये सामील झालेल्या महाडिक गटाचे वर्चस्व नेहमीच असते. या गटातही हिंदुत्वाने प्रेरित अनेक शिवसैनिक या गटात सामील झाले आहेत. याची प्रचिती लोकसभा निवडणुकीत आली आहे.
सद्यस्थितीला मतदारसंघांमध्ये माने गट नेहमीच शिवसेनेच्या विरोधात कार्य करत होता. मात्र धैर्यशील माने यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने अनेक शिवसैनिकांना माने यांचा प्रचार करावा लागला. माने गटाशी जुळवून घ्यावे लागले. मात्र सध्या खासदार धैर्यशील माने यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने अनेक शिवसैनिक त्यांच्यावर नाराज आहेत. ज्या हिंदुत्वाच्या भावनेने आपण एका खासदाराला मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. त्यानेच अनेकांची मने दुखावल्याची खंत शिवसैनिकांत आहे.
एकंदरीतच तालुक्यात शिवसेनेला मोठय़ा प्रमाणावर मरगळ आली आहे. याकडे नेतेमंडळींनी जाणूनबुजून कानाडोळा केल्याचे दिसत आहे. त्यामुळे शिवसेनेला पुन्हा मोर्चेबांधणीची गरज आहे. अन्यथा शिवसेनेचे मतदारसंघातील अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे. एकंदरीत तळागाळापर्यंत पोहोचलेली शिवसेना पक्षांतर्गत बंडामुळे अस्तित्वाच्या लढाईवर येऊन पोहोचल्याचे चित्र आहे.