महाप्रबोधन यात्रेतील निर्धार मेळाव्यात शिंदे-फडणवीस सरकार टीकास्त्र; भाजप राज्यात जाती-धर्मात विष पेरत असल्याचा आरोप
कोल्हापूर प्रतिनिधी
वाढती महागाई, बेरोजगारी यावर निमंत्रण आणण्यास अपयशी ठरलेल्या भाजपकडून जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष विचलित व्हावे यासाठी भावनिक राजकारण केले जात आहे. जाती जाती-धर्मां-धर्मांत विषाची पेरणी केली जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची टीम नियोजनबद्ध जातीय व्देष पसरवित आहे. अशा काळात महाराष्ट्र एकसंघ ठेवण्याची जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेवर आली आहे. त्यासाठी सर्व शिवसैनिकांची सज्ज व्हावे, असे आवाहन शिवसेनेच्या उपनेत्या व प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी केले. राजर्षी शाहू महाराजांच्या करवीरनगरीतून परिवर्तनवादी विचारांचा वारसा घेऊनच शिवसेनेची महाप्रबोधन यात्रा पुढे निघाली आहे. या यात्रेद्वारे राज्यातील सरकारला प्रश्न विचारले जात असल्याचेही यांनी स्पष्ट केले.
शिवसेना ठाकरे गटाचा निर्धार मेळावा येथील संगीतसूर्य केशवराव भोसले नाटय़गृहात बुधवारी झाला. या मेळाव्यात उपनेत्या अंधारे यांनी मार्गदर्शन केले. मंचावर उपनेत्या संजना घाडी, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, माजी आमदार सुरेश साळोखे, डॉ. सुजित मिणचेकर, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, उपशहर प्रमुख विशाल देवकुळे, महेश उत्तुरे, बाजीराव पाटील, माजी जिल्हा प्रमुख रवि चौगुले, महिला आघाडी संघटिका शुभांगी पवार, प्रतिज्ञा उत्तुरे, स्मिता सावंत, अवधुत साळोखे, कमलाकर जगदाळे, तानाजी आंग्रे, सागर साळोखे यांची प्रमुख उपस्थिती होती. उपनेत्या अंधारे यांच्या हस्ते शिवसेनेची मशाल पेटवण्यात आली.
अंधारे यांनी या मेळाव्यात शिंदे-फडणवीस सरकारच्या धोरणावर कडाडून हल्ला केला. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप, शिंदे गटाच्या नेते, आमदारांचा समाचार घेतला. त्या म्हणाल्या, हिंदूत्वाच्या नावाखाली भाजपला साथ देत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार करण्याचे पाप एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बरोबर गेलेल्या आमदारांनी केले आहे. चाळीस जण भाजपबरोबर का गेले आहेत? हे महाराष्ट्रातील जनता जानते. यापूर्वी भुजबळ, राणे, राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली पण ते शिवसेनेच्या मुळावर उठले नाहीत. मात्र शिंदे गट शिवसेना संपविण्याची भाषा करत आहेत. पण जनताच त्यांना जागा दाखवून देईल. शिवसेना प्रवाह आहे. ते कधीही संपणार नाही. शिवसैनिक ही त्याची ताकद आहे.
पक्ष बदलणाऱ्यांवर भरवसा कसा ठेवायचा
सुषमा अंधारे म्हणाल्या, मी राष्ट्रवादीतून आलेले पार्सल आहे, असे म्हणणाऱया पालकमंत्री दीपक केसरकर यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि शिंदे अशा किती उडय़ा मारल्या हे हे सांगावे, मी कधी राष्ट्रवादीत प्रवेश केला नव्हता. त्यामुळे पक्ष बदलणाऱयांची यादी वाचली तर तुम्हाला पळायलाही जागा राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
उपनेत्या संजना घाडी म्हणाल्या, शिवसेनेचे हिंदुत्व हे हाताला काम देणारे आहे. राज्यात भाजपकडून भ्रामक हिंदुत्वाची कल्पना निर्माण केली जात आहे. महिलांची सुरक्षिताता दावणीला लावली आहे. याच्या विरोधात जागृतीसाठी महाप्रबोधन यात्रेद्वारे अठरापगड लोंकांना एकत्रित आणले जात आहे. निर्धार मेळाव्यांतून गद्दारांची पोलखोल जनतेसमोर आणली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, आजही 70 टक्के कोल्हापूरकरांचे शिवसेनाप्रमुख हेच दैवत आहे. कोल्हापूरकर स्वाभिमानी आहेत. त्यामुळे शिंदे गटाच्या उमेदवाराला आगामी निवडणुकीत कोल्हापूरकर योग्य जागा दाखवतील, असा इशारा त्यांनी दिला.
शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी धर्मवीर चित्रपटात आनंद दिघे यांच्या नावाखाली स्वतःचे उदात्तीकरण करण्याचा डाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. त्यासाठी चांदोबा, विक्रमवेताळसारख्या काल्पनिक गोष्टी रचल्या. याआधी त्यांना कधीही दिघेंची आठवण झाली नव्हती, असा टोला मारला.
यावेळी विशाल देवकुळे, शुभांगी पवार, अवधुत साळोखे, तानाजी आंग्रे, कमलाकर जगदाळे, प्रतिज्ञा उत्तुरे यांची भाषणे झाली. मनजित माने यांनी स्वागत करून आभार मानले. मेळाव्याला नियाज खान, शशिकांत बिडकर यांच्यासह पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.
भाजपला मराठा मुख्यमंत्री रूचलेला नाही
एकनाथ शिंदे यांना हृदयावर दगड ठेवून मुख्यमंत्री केल्याचे चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. यावरून भाजपला मराठा मुख्यमंत्री रूचल्याचे दिसत नाही. फडणवीस व इतर भाजपनेत्यांकडून मुख्यमंत्री शिंदे यांना अकार्यक्षम ठरविण्याचे नॅरेटीव्ह सेट केले जात आहे. त्यांची बदनामी केली जात आहे. त्यातून सरकार पडून मध्यावधी निवडणुका 2023 मध्ये लागण्याची शक्यता आहे, त्याला शिवसैनिकांनी तयार राहावे, असे आवाहन अंधारे यांनी केले.
दलबदलुना कोल्हापूरची जनता चितपट करेल
कोल्हापुरातील दोन आमदार, दोन खासदार शिंदे गटात गेले. अशा दलबदलूंना करवीरची जनता आगामी निवडणुकीत नक्कीच चितपट करेल, असे सांगत अंधारे यांनी मंडलिक, माने, आबीटकर, राजेद्र पाटील-यड्रावकर यांचा समाचार घेतला.
इंगवले राज्यभर आमच्यासोबत फिरा
सुषमा अंधारे यांनी शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांच्या आक्रमक, मुद्देसूद भाषणाचे कौतुक करताना तुम्ही आमच्याबरोबर महाप्रबोधन यात्रेत फिरा, असे सांगितले.