आजरा/सुनील पाटील
राज्यात शिवसेनेत बंडाळीचं सत्र सुरू असले तरी कोल्हापूर जिल्हय़ातील आजरा तालुक्यातील शिवसेना मात्र आजही ‘मातोश्री’सोबत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. आजरा व गवसे मंडल विभाग समाविष्ट असलेल्या राधानगरी-भुदरगड मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत असलेले आमदार प्रकाश आबिटकर शिवसेनेची फारकत घेऊन शिंदे गटात दाखल झाले. दोनच दिवसांपूर्वी खासदार प्रा. संजय मंडलिक यांनीही मुख्यमंत्री शिंदे गटाचा रस्ता धरला. मात्र आमदार व खासदार शिंदे गटात गेले असले तरी तालुक्यातील शिवसैनिक मात्र मूळ शिवसेनेसोबतच एकनिष्ठ राहिला आहे.
आजरा तालुका शिवसेनेला मोठा नेता लाभला नाही. पण तालुक्यातील छोटय़ा-मोठय़ा शिवसैनिकांनी शिवसेना टिकवून ठेवण्याबरोबरच ती वाढवण्याचा प्रयत्न केला. दशकभरापूर्वी तालुका शिवसेनेत गटबाजी झाली तरी पुन्हा दोन्ही गटांनी जुळवून घेत शिवसेना एकसंघ राखण्यात यश मिळवले. स्व. दिलीप देऊस्कर यांच्यापासून तालुका शिवसेनेला वेगळी परंपरा आहे. नंतरच्या काळात संजय सावंत, संभाजी पाटील या मंडळींनीही शिवसेना वाढवण्याचा प्रयत्न केला. विद्यमान तालुकाप्रमुख राजेंद्र सावंत, युवराज पोवार यांनीही शिवसेनेच्या माध्यमातून विविध प्रश्नांवर आवाज उठवत सामान्यांचा आवाज म्हणजे शिवसेना हे समीकरण तालुक्यात तयार केले आहे.
इथला कट्टर शिवसैनिक नेहमीच शिवसेनेशी एकनिष्ठ राहिला. सत्ता असो अगर नसो शिवसेनेशी प्रामाणिक राहण्यात स्थानिक शिवसैनिकांनी धन्यता मानली. विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर शिवसेनेच्या तिकीटावर आमदार प्रकाश आबिटकर यांनी दोन वेळा निवडणूक लढवली, दोन्ही वेळेला स्थानिक शिवसैनिकांनी शिवसेनेचा उमेदवार म्हणून आबिटकरांच्या विजयात योगदान दिले. तसेच खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्यासाठी देखील शिवसेना पक्षाचा उमेदवार म्हणून भक्कमपणे पाठिशी राहिली.
शिवसेनेचे उमेदवार म्हणून आमदार व खासदारांच्या विजयात वाटा उचललेल्या शिवसैनिकांनी सेनेतील बंडाळीनंतर मात्र आमदार, खासदारांच्या भूमिकांचा जाहीर निषेध करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत कायम असल्याचे स्पष्ट केले. गेल्या काही वर्षांत तालुका शिवसेनेने स्थानिक स्वराज्य संस्थांबरोबरच सहकारातील राजकारणातही ताकदीने प्रवेश केला आहे. त्यामुळे तालुक्यात शिवसेनेची ताकद वाढली आहे. तालुक्यातील कोणीही शिवसैनिक मोठय़ा पदावर कार्यरत नसला तरी इथला शिवसैनिक शिवसेना म्हणून एकसंध राहिला आहे.
आजरा नगरपंचायतीच्या 2018 मध्ये झालेल्या पहिल्याच पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेनेचे जिल्हा उपसंघटक संभाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी केली. हाच पॅटर्न नंतर महाविकास आघाडी म्हणून राज्यभर राबवण्यात आला. राज्याच्या राजकारणात शिवसेनेत बंडाळी माजली असली तरी तालुक्यात महाविकास आघाडी आणि शिवसेना दोन्ही अजूनतरी एकसंघ असल्याचे चित्र आहे. शिवसेनेत आजवर किती आले आणि किती गेले, पण शिवसैनिक एकनिष्ठच राहिला आहे. आगामी काळातही तालुक्यातील शिवसैनिक पक्षप्रमुख ठाकरेंसोबतच राहील, अशी घोषणाही जिल्हा उपसंघटक संभाजी पाटील, तालुका प्रमुख पोवार व सावंत यांनी गेल्या महिन्याभरात अनेकदा केली आहे.