शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांचे भाजप आमदार नितेश राणेंवर टीकास्त्र
प्रतिनिधी,कोल्हापूर
छत्रपती शिवाजी महाराज, महाराणी ताराराणी राजर्षी शाहू महाराज यांच्या पवित्र वास्तव्याने पावन झालेली कोल्हापूरची भूमी आहे. या ठिकाणी कुणी बाहेरच्याने येऊन हिंदूत्व शिकविण्याची बिलकुल गरज नाही, अशा शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
दोन दिवसांपूर्वी मुलीच्या अपहरण प्रकरणात पोलीस तपासावर आक्षेप घेत निदर्शने करण्यासाठी आमदार राणे कोल्हापुरात आले होते.त्यांच्या येण्यावर आणि भाजपच्या भूमिकेवर इंगवले यांनी पत्रकात आक्षेप नोंदवताना टीकाही केली आहे. इंगवले यांनी म्हटले आहे. कोल्हापुरात आलेले राणे महाराष्ट्रात तथाकथीत हिंदूत्ववादी पक्ष समजणाऱ्या आणि हिंदूत्ववादी संघटनांना हिंदुत्वाचा परिपाट शिकवून गेले.
कोल्हापुरातील एका प्रकरणात राष्ट्रीय पक्षाने राणेंना बोलविणे याचा अर्थच त्यांच्याकडे हिंदूत्ववादींची संख्या अथवा हिंदूत्ववादी विचार आटला आहे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.ज्यांनी भाजपच्या प्रमुख नेतृत्वावर टीका केली,तेच भाजपवासी झाले.आता त्यांना हिंदू नेता म्हणून भाजपला गौरवावे लागते, हाच प्रश्न हिंदूत्ववाघांना पडला आहे.
हेही वाचा- शिंदे सरकारने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे-शशिकांत पवार
कोल्हापुरात जातीय सलोखा असल्याचे भाजप नेते मंत्री चंद्रकांतदादा पाटील नेहमी मान्य करतात.मुलीच्या अपहरण प्रकरणात पोलीस प्रशासन योग्य ती कारवाई करत आहेत.मुस्लिम बांधवांनीही योग्य त्या कारवाईची मागणी केली आहे.कोल्हापुरात जातीय सलोख्यानुसार सर्वजण राहत आहेत. जिहादी अथवा हिंदूत्ववादी नसणारी भूमिका आम्ही खपवून घेणार नाही. ती परतवून लावण्याचे आमच्यात सामर्थ्य आहे.त्यामुळे बाहेरच्या कुणीही येऊन कोल्हापुरात हिंदूत्व शिकवू नये आणि बाहेरच्या लोकांना बोलवून कोल्हापुरातील हिंदूत्चवादी चळवळीचा बाजार करू इच्छिणाऱया पक्षाने सुद्धा अशा लोकांचा अभ्यास करावा, अन्यथा जिल्हय़ात हद्दपार झालेला हा पक्ष महाराष्ट्रातून हद्दपार व्हायला वेळ लागणार नाही, अशा शब्दात इंगवले यांनी भाजपवर टीका केली आहे.