धीरज बरगे, कोल्हापूर
दीड लाखाहून अधिक मतांच्या गठ्ठ्याला ताकदवान नेत्याची जोड देत शिवसेना (Shivsena) कोल्हापूरसह हातकणंगले लोकसभा मतदार संघातील निवडणुक लढवत आली आहे. पण या फॉर्म्युल्याला 2014 पर्यंत कधीच यश मिळाले नाही. 2019 च्या निवडणुकीत मात्र या दोन्ही जागांवर शिवसेना विजयी झाली. गठ्ठा मतदान आणि ताकदवान नेता हे समीकरण यशस्वी झाले असले तरी या गणितामध्ये मुळचा शिवसैनिक नेहमीच उमेदवारीपासून वंचित राहिला आहे. शिवसेनेतील बंडानंतर जिल्ह्यातील दोन्ही खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत गेले आहेत.त्यामुळे ठाकरे गटाला पुन्हा उमेदवाराची शोधाशोध करावी लागणार आहे.ही शोधाशोध करताना पक्षप्रमुख शिवसैनिकांच्या मागणीनुसार शिवसैनिकाला संधी देणार का पुन्हा उसना उमेदवार येणार हे पुढील काळात स्पष्ट होणार आहे.
आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर शिवसेनेने (ठाकरे गट) जिल्ह्यात पेरणी सुरु केली आहे.काही दिवसांपुर्वी संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला.यामध्ये 2024 च्या लोकसभेला निष्ठावंत शिवसैनिकाला संधी देण्याची भावना शिवसैनिकांनी व्यक्त केली. जिल्हाप्रमुख विजय देवणे, मुरलीधर जाधव यांनी निवडणुक लढण्यास इच्छुक असल्याचे स्पष्टपणे सांगितले.यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मंगळवारी मातोश्रीवर पुन्हा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.बैठकीला सध्या कोणत्याही पक्षासोबत नसलेले गोकुळचे संचालक डॉ.चेतन नरके यांनी वडील अरुण नरके आणि भाऊ संदीप नरके यांच्यासोबत उपस्थिती लावली.नरकेंच्या उपस्थितीमुळे शिवसैनिकांच्या भुवया तर उंचावल्याच पण कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील उमेदवारीबाबत शिवसैनिकांमध्ये संभ्रमही निर्माण झाला आहे.
प्रत्येकवेळी उमेदवाराची शोधाशोध
निष्ठावंत शिवसैनिकाला लोकसभा लढण्याची संधी द्या,ही शिवसैनिकांची मागणी रास्त आहे.पण निष्ठावंतांना विजयापर्यंत पोहचण्यात मर्यादा असल्याचे वास्तव आहे. तसेच शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढलेले रामभाऊ फाळके,रमेश देव,मेजर शिवाजीराव पाटील,विक्रमसिंह घाटगे,धनंजय महाडिक,विजय देवणे, प्रा. संजय मंडलिक यापैकी बहुतांश उमेदवार पुढील निवडणुकीत शिवसेनेसोबत राहिलेले नाही.प्रा.संजय मंडलिक हे एकमेव उमेदवार आहेत जे पराभूत झाल्यानंतरही पुढील निवडणुक शिवसेनेकडुनच लढले.दुसऱ्या प्रयत्नात त्यांना यश मिळाले.मात्र सध्याच्या बदलेल्या राजकीय परिस्थितीत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याने ठाकरे गटाला 2024 च्या निवडणुकीसाठीही उमेदवाराची शोधाशोध करावी लागणार आहे.
ठाकरे गटाची वाट बिकटच
मुंबई पाठोपाठ कोल्हापूर हा शिवसेनेचा बालेकिल्ल राहिला आहे.सध्यातरी दोन्ही जाग लढवायच्या अशी भुमिका असली तरी दोन्ही मतदार संघातील ठाकरे गटाची सद्यस्थिती पाहता विजयापर्यंत पोहचतील असे उमेदवार शिवसेनेकडे नाहीत.महाविकास आघाडी म्हणुन निवडणुक लढल्यास कोल्हापूर लोकसभा काँग्रेसकडे घेण्यासाठी आमदार सतेज पाटील आग्रही राहण्याची शक्यता आहे.तर हातकणंगलेमधून माजी खासदार राजू शेट्टी हे महाविकास आघाडीसोबत जाण्याची शक्यता आहे.हे चित्र पाहात बालेकिल्ल्यातील ठाकरे गटाची वाट बिकट बनल्याचे दिसून येत आहे.
कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार व त्यांना मिळालेली मते अशी :
निवडणुक वर्ष उमेदवाराचे नाव मिळालेली मते
2004 धनंजय महाडिक 4,01,922
2009 विजय देवणे 1,72,822
2014 प्रा. संजय मंडलिक 5,74,406
2019 प्रा. संजय मंडलिक 7,49,085
हातकणंगले मतदार संघातील उमेदवार व मिळालेले मते अशी
निवडणुक वर्ष उमेदवाराचे नाव मिळालेली मते
2009 रघुनाथ पाटील 55,050
2014 राजू शेट्टी यांना पाठींबा 6,40,428
2019 धैर्यशील माने 5,85,776









