जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर : बेळगाव शिवसेनेतर्फे 59 वा वर्धापन दिन साजरा
बेळगाव : शिवसेना (उबाठा) पक्ष सीमावासियांच्या नेहमीच पाठीशी राहिला आहे. सीमाप्रश्न निकालात निघावा, अशी शिवसेनेची भूमिका कायम आहे. म. ए. समितीच्या आंदोलनांमध्ये शिवसेनेने सहभाग घेतला आहे. भविष्यातही सीमावासियांच्या पाठीशी शिवसेना राहणार आहे, असे मत शिवसेनेचे बेळगाव जिल्हा अध्यक्ष प्रकाश शिरोळकर यांनी व्यक्त केले. बुधवारी रामलिंगखिंड गल्ली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात शिवसेनेचा 59 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. शिवसैनिक व म. ए. समिती पदाधिकाऱ्यांच्या हस्ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
भाषावार प्रांतरचना झाल्यानंतर अन्यायाने मराठीबहुल भाग कर्नाटकात डांबण्यात आला. तेव्हापासून म. ए. समितीच्यावतीने वेगवेगळ्या प्रकारे आंदोलने केली जात आहेत. या सर्व आंदोलनांना शिवसेनेने नेहमीच पाठिंबा दिला आहे. इतकेच नव्हे तर सीमाप्रश्नासाठी शिवसेनेने हुतात्मेही दिले आहेत. शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी सीमाप्रश्नाची पालखी आपल्या खांद्यावर घेतली होती. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हेदेखील सीमाप्रश्नासाठी तितकेच तळमळीने काम करतात. लवकरात लवकर सीमाप्रश्न सुटावा अशी सीमावासियांची मागणी आहे, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. यावेळी नगरसेवक रवी साळुंखे, माजी महापौर मालोजी अष्टेकर, माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, शिवाजी सुंठकर, महेश टंकसाळी, रमेश माळवी, मनोज पावशे यांच्यासह शिवसेना व समिती कार्यकर्ते उपस्थित होते.









