बेळगाव : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे शुक्रवार दि. 28 फेब्रुवारीपासून सकाळी 6.30 वाजता शंभूतीर्थ येथे धर्मवीर संभाजी महाराजांचे पूजन करून धर्मवीर बलिदान मासाला प्रारंभ झाला. फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या दरम्यान बलिदान मास पाळण्यात येतो. प्रारंभी प्रेरणामंत्र म्हणून संभाजी महाराजांच्या मूर्तीला विधीवत अभिषेक करण्यात आला. त्यानंतर संभाजी सूर्यहृदय श्लोक म्हणण्यात आला. ध्येयमंत्र म्हणून संभाजी महाराजांना पहिली श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी जिल्हा प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. धर्मवीर संभाजी महाराजांचे बलिदान समस्त हिंदू धर्मासाठी आहे याची जाणीव ठेवून प्रत्येक हिंदू व्यक्तीने धर्मवीर बलिदान मासचे नित्य आचरण काटेकोरपणे करावे, असे आवाहन करण्यात आले. शिवाय गल्लोगल्ली धर्मवीर बलिदान मास केंद्रे आहेत. त्याठिकाणी शिवभक्तांनी उपस्थित राहून महाराजांना गांभीर्याने श्रद्धांजली वाहावी. याप्रसंगी प्रांतप्रमुख किरण गावडे, शहरप्रमुख अनंत चौगुले, विभागप्रमुख पुंडलिक चव्हाण, चंद्रशेखर चौगुले, किरण बडवाण्णाचे यासह धारकरी उपस्थित होते.
शिवसेनेतर्फे धर्मवीर संभाजी महाराजांचे पूजन
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्यावतीने धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मासनिमित्त छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. यावेळी उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर यांच्या हस्ते पूजन झाले. याप्रसंगी उपशहरप्रमुख प्रकाश राऊत, बाळकृष्ण चव्हाण पाटील, स्वराज पाटील, अमर कडगावकर, तानाजी पावशे, प्रवीण तेजम, राजू तुडयेकर, मयुरेश काकतकर, विठ्ठल हुंदरे, आनंद गोंधळी, बाळू भोसले आदी उपस्थित होते.









