मध्यवर्ती उत्सव मंडळांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन
बेळगाव : परंपरेप्रमाणे मंगळवार दि. 29 रोजी बेळगावसह परिसरात शिवजयंती साजरी केली जाणार आहे. यानिमित्ताने शिवजयंती उत्सव मंडळांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. काही ठिकाणी पोवाडे, शिवकालीन युद्धकला सादरीकरण, ढोल-ताशा पथकाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दि. 29 रोजी सकाळी 7 वाजता धर्मवीर संभाजी चौक येथे शिवज्योतींचे स्वागत करण्यात येणार आहे. सकाळी 9 वाजता नरगुंदकर भावे चौकातील मंडपात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे विधिवत पूजन केले जाणार आहे. सकाळी 10 वाजता शहापूर शिवाजी उद्यान येथील शिवरायांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे.
गुरुवारी भव्य चित्ररथ मिरवणूक
बेळगावच्या शिवजयंतीचे वैशिष्ट्या म्हणजे सजीव देखाव्यांची चित्ररथ मिरवणूक. यावर्षी गुरुवार दि. 1 मे रोजी शिवजयंती चित्ररथ मिरवणूक पारंपरिक पद्धतीने काढली जाणार आहे. सायंकाळी 6 वाजता नरगुंदकर भावे चौक येथे छ. शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून चित्ररथ मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. तर रविवार दि. 4 मे रोजी सकाळी 7 वाजता राजहंसगड चढणे-उतरणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाने कळविले आहे.









