वार्ताहर/किणये
सावगाव येथील शिवस्मारक सेवा समिती व शिवप्रेमी नागरिक यांच्या वतीने सोमवारी सकाळी शिवस्मारक येथे तिथीप्रमाणे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला. त्यानंतर शिवस्मारक सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. उपस्थित कार्यकर्ते व धारकऱ्यांनी ध्येयमंत्र व प्रेरणामंत्र म्हटले. छत्रपती शिवाजी महाराज की जय…जय भवानी जय शिवाजी…असा जयघोष करण्यात आला. त्यानंतर महाआरती करण्यात आली. याप्रसंगी विविध मान्यवरांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित भाषणे झाली. सावगाव येथील शिवस्मारक येथे रोज पहाटे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात येते. रोज गावातील व परिसरातील विविध मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात येते. हा तऊणांनी चालविलेला उपक्रम कौतुकास्पद आहे, असे काही मान्यवरांनी आपल्या भाषणातून सांगितले. शिवजयंती सोहळ्यासाठी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









