कार्यकर्त्यांमध्ये उत्साह, पेहरावासह साहित्याचे बुकिंग, जिवंत देखाव्यांवर भर : शिवरायांचा तेजोमय इतिहास नागरिकांसमोर आणला जाणार
बेळगाव : शहरात ऐतिहासिक आणि वैभवशाली शिवजयंती चित्ररथ मिरवणूक शनिवार दि. 27 रोजी काढली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पारंपरिक शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीच्या तयारीला वेग आला आहे. तमाम शिवभक्त आणि चित्ररथ मिरवणुकीतील कलाकारांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. शहरातील शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीला मोठी परंपरा आहे. शिवरायांच्या आयुष्यातील तेजोमय घटनांवर आधारित जिवंत देखावे सादर केले जातात. कलाकार हुबेहुब भूमिका साकारतात. यासाठी आता कलाकारांची तयारीसाठी धडपड सुरू झाली आहे. उत्तम सादरीकरणासाठी कलाकारांमध्ये उत्साह संचारला आहे. एकूणच चित्ररथ मिरवणुकीच्या तयारीसाठी शिवभक्त आणि कलाकारही उत्साही झाले आहेत.
पेहराव आणि इतर साहित्याचे बुकिंग
शिवरायांच्या जीवनावरील प्रसंग सादर करण्यासाठी पेहराव आणि इतर साहित्याला पसंती दिली जाते. हुबेहुब भूमिका साकारण्यासाठी पेहराव, ढाल, तलवार, जिरेटोप, दांडपट्टा, झांजपथक आदी साहित्य बुक केले जात आहे. त्याबरोबरच भगव्या टोप्या, फेटे आणि भगवे झेंडे आदींना मागणी वाढू लागली आहे. या चित्ररथ मिरवणुकीत शिवप्रेमींचा जल्लोष पाहायला मिळणार आहे.
ट्रॅक्टर, ट्रक, चेसींचे बुकिंग
चित्ररथ मिरवणूक ट्रक आणि ट्रॅक्टर चेसीतून काढली जाते. त्यामुळे ट्रॅक्टर आणि ट्रकच्या चेसीदेखील बुक केल्या जात आहेत. चेसी बुक करण्यासाठी हरिकाका कंपाउंड येथे कार्यकर्त्यांची लगबग सुरू आहे. शहरात तब्बल 64 हून अधिक चित्ररथ मिरवणूक मंडळे आहेत. यांच्याकडून चेसी बुक केल्या जात आहेत.
सायंकाळी विविध ठिकाणी सराव
शिवजयंती चित्ररथ मिरवणूक अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपल्याने मिरवणुकीत भूमिका साकारणारे कलाकार, सायंकाळच्या वेळेत सराव करू लागले आहेत. यासाठी केवळ तीन दिवस शिल्लक असल्याने सरावाला वेग आला आहे. चित्ररथ मिरवणूक मंडळांकडून विविध ठिकाणी सराव केला जात आहे. कलाकारांकडून उत्तम सादरीकरणासाठी सरावावर अधिक भर दिला जात आहे.
मिरवणुकीत उपनगरांतील मंडळांचा सहभाग
शनिवारी होणाऱ्या चित्ररथ मिरवणुकीत उपनगरांतील मंडळेही सहभागी होणार आहेत. विनायकनगर, नेहरूनगर, शाहूनगर, सह्याद्रीनगर कॅम्प आदी भागातील चित्ररथ मंडळे सहभागी होणार आहेत. त्यामुळे यंदाची चित्ररथ मिरवणूक कोरोनानंतर जल्लोषात आणि उत्साहात होणार आहे.
परराज्यांतील नागरिक- शिवभक्तांची उपस्थिती
बेळगाव येथील शिवजयंती चित्ररथ मिरवणूक डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी परराज्यांतील नागरिक आणि शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. गोवा आणि महाराष्ट्रातील नागरिकही आवर्जुन उपस्थिती दर्शवतात. या मिरवणुकीसाठी चंदगड, खानापूर, गोवा, कोल्हापूर आदी भागातून शिवभक्त दाखल होणार आहेत.
64 हून अधिक मंडळे होणार सहभागी
शहरात शनिवारी होणाऱ्या चित्ररथ मिरवणुकीत 64 हून अधिक मंडळे सहभागी होणार आहेत. शिवाय त्यांच्याकडून विविध भूमिका सादर केल्या जाणार आहेत. त्याद्वारे शिवरायांचा तेजोमय इतिहास नागरिकांसमोर आणला जाणार आहे. त्यामुळे आबालवृद्धांसह शिवभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.









