सायंकाळी 6 वाजता नरगुंदकर भावे चौक येथे पालखी पूजन
बेळगाव : बेळगावमध्ये मोठ्या उत्साहात शिवजयंती चित्ररथ मिरवणूक काढली जाते. यावर्षी कर्नाटक विधानसभा निवडणुकांमुळे शनिवार दि. 27 मे रोजी चित्ररथ मिरवणूक काढली जाणार आहे. पारंपरिक पद्धतीने सायंकाळी 6 वाजता नरगुंदकर भावे चौकात शिवरायांच्या पालखीचे पूजन केले जाणार आहे. त्यानंतर शहराच्या मध्यवर्ती भागातून भव्य मिरवणूक काढली जाणार आहे. शिवरायांच्या जाज्ज्वल्य इतिहासाची साक्ष देणारे प्रसंग प्रेरणादायी ठरतात. बेळगावमध्ये सजीव देखावे सादर केले जात असल्याने याची ख्याती सर्वदूर पसरली आहे. केवळ शिवचरित्रातील प्रसंग सादर होतात असे नाही. सध्याच्या पिढीला शिवरायांचे विचार कसे उपयोगी पडतात, सध्याचे सामाजिक प्रश्न या विषयांवरही देखावे सादर केले जातात. साक्षात शिवशाही बेळगावमध्ये अवतरल्याचा अनुभव या मिरवणुकीदरम्यान होतो. चित्ररथांसमोर लाठीमेळा, लेझीम, ढाल, तलवार, दांडपट्टा, झांजपथक अशी विविध रूपे सादर करणारे मर्दानी खेळ व दृश्य शिवप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी असतात. मिरवणुकीत आबालवृद्धांसह महिलांचीही उपस्थिती लक्षणीय असते. यासाठी चित्ररथ देखावा मिरवणुकीत सहभाग घेणाऱ्या शिवजयंती मंडळांनी संयम, समन्वय, शिस्तबद्धता व शांततेने अपूर्व उत्साहात आपापल्या ठरविलेल्या विभागातून जल्लोषात चित्ररथ मुख्य मिरवणुकीत सहभागी क्हावे, जेणेकरून आपण अथक परिश्रम करून केलेला सराव, त्यातून साकार केलेल्या शिवकालीन भूमिका पाहून शिवप्रेमी नागरिकांना तुमचे कौतुक करण्याची संधी मिळेल, असे आवाहन मध्यवर्ती शिवजयंती मंडळाचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी केले आहे.
असा असणार मिरवणुकीचा मार्ग
चित्ररथ मिरवणुकीला पारंपरिक पद्धतीने सायंकाळी 6 वाजता नरगुंदकर भावे चौकातून सुरुवात होणार आहे. त्यानंतर मारुती गल्ली, हुतात्मा चौक, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, यंदेखूट (राजेंद्रप्रसाद चौक), कॉलेज रोड, धर्मवीर संभाजी चौक, किर्लोस्कर रोडमार्गे रामलिंगखिंड गल्ली, टिळक चौक, हेमुकलानी चौक, शनिमंदिर, छत्रपती शिवाजी महाराज उ•ाणपूल (कपिलेश्वर रोड) मार्गे, कपिलेश्वर मंदिरजवळ मिरवणुकीची सांगता होईल.









