7 ते 8 मंडळांकडून सजीव देखाव्यांचे होणार सादरीकरण
बेळगाव : वडगाव परिसरातील शिवजयंती चित्ररथ मिरवणूक बुधवार दि. 30 रोजी होणार आहे. यावर्षी 7 ते 8 मंडळांनी सजीव देखाव्यांची तयारी केली आहे. सायंकाळी 8 वाजल्यापासून देखाव्यांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. काही मंडळांनी फिरते देखावे सादर करण्याऐवजी एकाच ठिकाणी मंडप घालून देखावे सादर करण्याची तयारी केली आहे. बेळगाव शहरासोबतच उपनगरांमध्ये मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी होते. शहापूर व बेळगाव येथे गुरुवार दि. 1 रोजी चित्ररथ मिरवणूक काढली जाणार आहे. त्याच्या एक दिवस आधी म्हणजे बुधवार दि. 30 रोजी वडगावमध्ये देखावे सादर केले जाणार आहेत. दत्त गल्ली-सोनार गल्ली, वझे गल्ली, रयत गल्ली, पाटील गल्ली-वडगाव, नाझर कॅम्प व इतर काही मंडळे सजीव देखावा सादर करणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित हे देखावे असणार आहेत. मागील वर्षी पावसामुळे शिवप्रेमींचा हिरमोड झाला होता. यावर्षी मात्र मोठ्या उत्साहात सजीव देखावे सादर करण्याची जय्यत तयारी मंडळाकडून सुरू आहे.









