किरकोळ अपवाद वगळता संपूर्ण मिरवणूक शांततेत : गुरुवारी सकाळपर्यंत उत्साह कायम
प्रतिनिधी / बेळगाव
बुधवारी बेळगावात झालेली शिवजयंती मिरवणूक तब्बल 11 तासांहून अधिककाळ चालली. या मिरवणुकीत शिवभक्तांनी मोठय़ा संख्येने हजेरी लावली होती. कोरोना महामारीमुळे तब्बल दोन वर्षांनंतर झालेली ही मिरवणूक भव्य होती. मात्र व्यापक खबरदारी घेऊनही मिरवणुकीत काही अप्रिय घटना घडल्या आहेत. या मिरवणुकीत 54 चित्ररथ सहभागी झाले होते, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
बुधवारी सायंकाळी 6.45 वाजता नरगुंदकर भावे चौक परिसरात पालखी पूजनाने मिरवणुकीला सुरुवात झाली. लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, शिवजयंती उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱयांच्या उपस्थितीत मिरवणुकीला सुरुवात झाली. यंदा काही चित्ररथ लवकर दाखल झाले होते. त्यामुळे मिरवणूक लवकर निघणार अशी अटकळ होती. मात्र ही अटकळ खोटी ठरली.
गुरुवारी सकाळी 7.45 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी गणपत गल्ली, मारुती गल्ली, समादेवी गल्ली परिसरातून चित्ररथ परत पाठविले.
पहाटे 4 नंतर पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी अनेक मंडळांच्या डीजेचा आवाज कमी करण्यास भाग पाडला. सकाळी काही ठिकाणी पोलिसांनी सौम्य लाठीमारही केला.
मिरवणुकीच्या काळात काही अप्रिय घटना घडल्या आहेत. काकतीवेस परिसरात अनिकेत गवळी (वय 23), अभिषेक गवळी (वय 24) या दोन कार्यकर्त्यांवर टोच्याने हल्ला करण्यात आला. यासंबंधी खडेबाजार पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. या घटनेचे निश्चित कारण समजू शकले नाही.
बुधवारी मध्यरात्री 2.30 वाजण्याच्या सुमारास नरगुंदकर भावे चौक परिसरात प्रशांत आडाव (वय 27), स्वप्निल बेळगावकर (वय 17), मनोहर तेजम (वय 28, सर्व रा. पाटील मळा) या तरुणांना मारहाण करण्यात आली आहे. तर 3.30 वाजण्याच्या सुमारास कडोलकर गल्ली परिसरात विनायक रामदास बिडीकर (वय 23, रा. खासबाग) या तरुणाला मारहाण झाली आहे.
समर्थनगर येथील गुरु बसवराज हिरेमठ या तरुणावर गणपत गल्ली परिसरात मारहाण करण्यात आली. सर्व जखमींवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले आहेत. वैयक्तिक व क्षुल्लक कारणे, डीजेसमोर नाचताना झालेली धक्काबुक्की आदी कारणांवरून हाणामारीचे प्रकार घडले आहेत. पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या हे स्वतः शेवटच्या घटकेपर्यंत शहराचा फेरफटका मारत होते.
प्रचंड गर्दी मात्र, मिरवणुकीत विस्कळीतपणा
शिवचरित्रावर आधारित जिवंत देखावे पाहण्यासाठी बुधवारी रात्री शिवभक्तांची प्रचंड गर्दी जमली होती. मिरवणुकीतील विस्कळीतपणामुळे शिवभक्तांना व्यवस्थितपणे देखावे पाहता आले नाहीत तर काही मंडळांना वेगवेगळय़ा ठिकाणी अडकून पडल्यामुळे देखावे सादर करता आले नाहीत. अशी विचित्र स्थिती निर्माण झाली होती. मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी पोलीस दलाने मोठा फौजफाटा तैनात केला होता. बेळगाव पोलिसांच्या या प्रयत्नांना यश आले. किरकोळ अपवाद वगळता संपूर्ण मिरवणूक शांततेत पार पडली.