वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक
यमनापूर येथील श्री छत्रपती शिवाजी युवक मंडळ, विविध संघ व ग्रामस्थांच्यावतीने मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सोमवारी किल्ले भुदरगड येथून शिवज्योत आणण्यासाठी कार्यकर्ते रवाना झाले होते. मंगळवारी सकाळी 8 वाजता किल्ले भुदरगडहून आणलेल्या शिवज्योतचे गावामध्ये उत्साही स्वागत करण्यात आले. यानंतर श्री छत्रपती शिवाजी युवक मंडळ, ग्रामीण अभिवृद्धी संघ, राजे ग्रुप, गावातील विविध महिला मंडळे व ग्रामस्थांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, धर्मवीर संभाजी महाराज की जय, हिंदू राष्ट्र की जय अशा घोषणा देऊन वातावरण शिवमय केले. यानंतर उपस्थित सुवासिनींनी पाळणा पूजन करून पाळणागीत म्हटले.









