खानापूर : शासकीय शिवजयंती येथील तहसीलदार कार्यालयात साजरी करण्यात आली. शिरस्तेदार प्रकाश कट्टीमणी यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी माजी आमदार दिगंबर पाटील, समिती नेते प्रकाश चव्हाण, जगन्नाथ बिर्जे, बी. बी. पाटील, आबासाहेब दळवी, विनायक सावंत, बबन अल्लोळकर, धनंजय देसाई, बाळाराम सावंत, ईश्वर बोबाटे यासह तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. यासह नगरपंचायतीत नगराध्यक्षा मिनाक्षी बैलूरकर यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी नगरसेवक आणि कर्मचारी उपस्थित होते. तालुका पंचायत, जिल्हापंचायत, बस स्थानकात सर्व ग्राम पंचायत कार्यालये तसेच शासकीय कार्यालयात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून शिवजयंती साजरी करण्यात आली.
यानंतर येथील शिवस्मारक आवारातील शिवपुतळ्याला शासनाच्यावतीने शिरस्तेदार प्रकाश कट्टीमणी यांच्या हस्ते पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवस्मारक ट्रस्टचे श्रीकांत दामले, प्रकाश चव्हाण, बाळासाहेब शेलार, आबासाहेब दळवी, जगन्नाथ बिर्जे, धनंजय देसाई यासह इतर शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजपच्यावतीने तसेच ब्लॉक काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, नगराध्यक्षा आणि नगरसेवक यासह विविध संघ संघटनांच्यावतीने शिवस्मारकातील शिवपुतळ्याला मार्लापण करून अभिवादन केले. यावेळी शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, संजय कुबल, सुरेश देसाई तर काँग्रेसचे सुरेश जाधव, गुड्डुसाब टेकडी, साईश सुतार, अभिषेक शहापूरकर, भरतेश तोरोजी, इसाकखान पठाण, महादेव कोळी, विवेक तडकोड, अनंत मादार, राजू कांबळे, हणमंत सोनटक्के, गणपती मादार, दिनेश मादार, सुजल मादार, यांनी शिवस्मारकाची पाहणी करून समाधान व्यक्त केले. तसेच शिवस्मारक ट्रस्टतर्फे चालवण्यात येणाऱ्या वाचनालयाच्या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले.
सर्वपक्षीय नेत्यांचाही उत्साह
शासनाच्यावतीने शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. मात्र शासकीय स्तरावर शिवाजी महाराजांची जयंती औपचारिकता म्हणून साजरी करण्यात येत असल्याचे दिसून येते. येथील विविध संघ संघटनांचे आणि शिवप्रेमी नागरिक तसेच सर्वपक्षीय नेत्यांचाही शासकीय शिवजयंतीबाबत उत्साह अजिबात दिसून येत नव्हता. खानापूर तालुक्यात आणि शहरात पारंपारिक शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहाने आणि मोठ्या दिमाखात साजरी करण्यात येते. मात्र शासकीय शिवजयंतीबाबत उत्साह दिसून येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.









