वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी खुर्द गावासह परिसरात परंपरेनुसार होणारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मंगळवारी मोठ्या उत्साहात व विविध कार्यक्रमांचे आयोजन करून करण्यात आली. गावच्या प्रवेशद्वारापाशी महात्मा फुले मंडळ,प्रगती सहकार मंडळ व शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व ग्रामस्थ यांच्यावतीने झालेल्या कार्यक्रमात मार्कंडेय साखर कारखान्याचे अध्यक्ष आर. आय. पाटील, अडत व्यापारी के. बी. पाटील, व्ही. बी. पाटील, शंकर बाळेकुंद्री यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे व अश्वाचे पूजन करण्यात आले. हुतात्मा मारुती बेन्नाळकर मार्ग फलकाचे पूजन विद्या जाधवसह इतर महिलांच्या हस्ते करण्यात आले. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान फलकाचे पूजन संजय पाटील व एम. वाय. पाटील यांनी केले. मूर्तीसमोर पूजन व श्रीफळ वाढविणे अन्य मान्यवरांच्या हस्ते झाले. पाळणा पूजन व पाळणे म्हणणे रुक्मिणी निलजकरसह इतर भगिनींनी केले. आरती, ध्येयमंत्र श्लोक म्हणण्यात आले. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना शिवरायांचे आचार, विचार सांगून आदर्श घेण्याचे आवाहन केले. यावेळी शिवभक्त महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. टी. डी. पाटील यांनी सूत्रसंचालन व आभार मानले. कंग्राळी खुर्द गावामध्ये या व्यतिरिक्त रामनगर चौथ क्रॉस येथील जनसेवा संघ, नारायण गल्ली, संभाजी गल्ली, पाटील गल्ली, ज्योतीनगर आदी विविध ठिकाणी शिवजयंती उत्साहाने साजरी करण्यात आली.









