गल्लोगल्ली उत्साह : नरगुंदकर भावे चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन, विविध ठिकाणी शिवज्योतींचे स्वागत, उद्या चित्ररथ मिरवणूक
बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने आणि तरुणाईच्या सळसळत्या उत्साहात मंगळवारी बेळगाव शहरासह उपनगरांमध्ये जल्लोषात शिवजयंती साजरी झाली. मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्यावतीने नरगुंदकर भावे चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. याचबरोबर शिवज्योत घेऊन आलेल्या कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार आणि शिवरायांचे महत्त्व सांगणारे पोवाडे मंगळवारी सर्वत्र ऐकू येत होते. बेळगावमध्ये परंपरेनुसार अक्षय्य तृतीयेला शिवजयंती साजरी केली जाते. यानिमित्ताने गल्लोगल्ली मंडप उभारून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे मंगळवारी पूजन करण्यात आले. शहापूर येथील छत्रपती शिवाजी उद्यान येथील शिवमूर्तीला आकर्षक सजावट करण्यात आली होती. जय भवानी, जय शिवाजीच्या गजरात शिवमूर्तीचे ठिकठिकाणी पूजन करण्यात आले.
मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्यावतीने नरगुंदकर भावे चौक येथील शिवमूर्तीचे पूजन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिवमूर्तीचे पूजन झाले. त्याचबरोबर शिवाजी उद्यान येथेही विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी शिवमूर्तीला अभिवादन केले. बेळगावमधील शिवजयंतीला प्रारंभ झाला असून गुरुवार दि. 1 रोजी भव्य चित्ररथ मिरवणूक काढली जाणार आहे. यावेळी मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाचे मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे, रमाकांत कोंडुसकर, रमेश पावले, शहापूर महामंडळाचे नेताजी जाधव, माजी आमदार परशुरामभाऊ नंदिहळ्ळी, रेणू किल्लेकर, सरिता पाटील, सुधा भातकांडे, अंकुश केसरकर, श्रीकांत कदम, मदन बामणे, अॅड. अमर येळ्ळूरकर, रणजित चव्हाण-पाटील, रवी साळुंके, मोतेश बारदेशकर, गणेश दड्डीकर, राजू मरवे यासह बेळगावमधील शिवप्रेमी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
शिवज्योतींचे जल्लोषात स्वागत
शिवजयंती दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांवर प्रज्ज्वलित केलेल्या ज्योती आपल्या मंडळात आणाव्यात या उद्देशाने सोमवारी अनेक शिवप्रेमी बेळगाव परिसरातील गड-किल्ल्यांवर पोहोचले. भुईकोट किल्ला, राजहंसगड, भीमगड, आनंदगड, देवगड, मालवण, विजयदुर्ग, नेसरी, सामानगड आजरा, वल्लभगड संकेश्वर येथून शिवज्योती बेळगावमध्ये आणण्यात आल्या. धर्मवीर संभाजी चौक येथील छत्रपती संभाजी महाराज परिसर तसेच शहापूर येथील शिवाजी उद्यान येथे शिवज्योतींचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्यावतीने सहभागी शिवप्रेमींना स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
या मंडळांनी आणल्या शिवज्योत
ब्रह्मलिंग युवक मंडळ गंगानगर गणेशपूर, छत्रपती शिवाजी महाराज युवक प्रतिष्ठान लक्ष्मीनगर हिंडलगा, कंग्राळ गल्ली, खंजर गल्ली, बाल शिवाजी युवक मंडळ लोहार गल्ली अनगोळ, गणेश युवक मंडळ गणेशपेठ जुने बेळगाव, अनंतशयन गल्ली, आनंदवाडी, बाल शिवाजी युवक मंडळ मेणसे गल्ली, स्वराज्य युवक मंडळ मजगाव, छत्रपती शिवाजी युवक मंडळ कल्लेहोळ, शिवज्योत मंडळ राजारामनगर उद्यमबाग, रामदेव गल्ली हिंडलगा, वायुपुत्र सेना मंडळ नवी गल्ली, ओमकार तरुण मित्र मंडळ पवार गल्ली शहापूर, एकता युवक मंडळ हट्टीहोळ गल्ली, मराठा युवक मंडळ होसूर, शिवशक्ती युवक मंडळ शास्त्रीनगर, कोरे गल्ली शहापूर शिवजयंती उत्सव मंडळासह इतर मंडळांनी शिवज्योत बेळगाव परिसरातील किल्ल्यावरून शहरात आणली.









