रत्नागिरी : गरीब मजूर, कामगारांची उपासमार टाळण्यासाठी शासनाने कोरोना काळापासून शिवभोजन थाळी केंद्र सुरू केली. मात्र जिल्ह्यातील या शिवभोजन थाळी केंद्रांना आता घरघर लागली आहे. शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणल्याचा मोठा आर्थिक भार राज्याच्या तिजोरीवर पडल्याने तो कमी करण्यासाठी शिवभोजन थाळी योजना बंद करण्याच्या दृष्टीने शासनाच्या हालचाली सुरू आहेत. सध्या जिल्ह्यातील २६ केंद्रांपैकी आता फक्त १२ केंद्र सुरू असून १४ केंद्र बंद झाली आहेत.
शासनाकडून दहा रुपयांत शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली. यात दहा रुपयांत पोटभर जेवण मिळते. कोरोना काळात तत्कालीन शासनाकडून ही थाळी मोफत दिली जात होती. आता पुन्हा ही थाळी दहा रुपयांत देण्यात येते. यांसाठी केंद्रचालकांना ४० रुपये अनुदान देण्यात येते. मात्र, हे अनुदान महागाईमुळे आता अपुरे पडत आहे. जिल्ह्यात २६ शिवभोजन केंद्र मंजूर आहेत. त्या केंद्रांना ३,०५० थाळ्या मंजूर आहेत. परंतु या केंद्रांपैकी सद्यस्थितीत १२ केंद्रच सुरू आहेत.
या सर्व शिवभोजन केंद्रांवर १० रुपयात जेवण दिले जाते. या केंद्र चालकांना प्रत्येक थाळीमागे लाभार्थीचे १० रुपये आणि शासनाकडून ४० रुपयांचे अनुदान मिळते. मजुरांची मजुर उपासमार टळावी, यासाठी शासनाकडून १० रुपयांत दिल्या जाणाऱ्या शिवभोजन थाळीमध्ये भात, चपाती, आमटी, भाजीचा समावेश आहे. आता शिवभोजन थाळी योजना बंद करण्याच्या दृष्टीने शासनाने हालचाली सुरू केल्या आहेत.








