खानापूर : शहरासह तालुक्यात पारंपरिक पद्धतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. येथील ज्ञानेश्वर मंदिरात मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्यावतीने दुपारी 12.30 वाजता शिवजन्म सोहळा साजरा करण्यात आला. लक्ष्मी मंदिर, रवळनाथ मंदिर, चव्हाटा मंदिर, देसाई गल्ली या ठिकाणी शिवप्रतिमेचे पूजन करून शिवजयंती साजरी करण्यात आली. बाजारपेठ येथील बसवेश्वर मंदिरात बसवेश्वर जन्मसोहळा साजरा करण्यात आला. मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्यावतीने माजी आमदार दिगंबर पाटील, समिती नेते प्रकाश चव्हाण, युवा समाजसेवक राजेंद्र चित्रगार, शहर समितीचे अध्यक्ष मारुती गुरव, ता. पं. माजी सदस्य कृष्णा कुंभार, रुक्माण्णा झुंजवाडकर यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आले. त्यानंतर शिवप्रतिमेचे पूजन, बसवेश्वर प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर शिवजन्म सोहळा साजरा करण्यात आला. सुवासिनींनी शिवजन्म सोहळा साजरा करून पाळणा गायिला. त्यानंतर पुष्पवृष्टी करण्यात आली. सायंकाळी 6 वाजता मध्यवर्ती शिवजयंती मंडळाच्यावतीने शिवस्मारक येथे पालखीचे पूजन समिती नेते प्रकाश चव्हाण, राजा शिवछत्रपती ट्रस्टचे अध्यक्ष एम. पी. पाटील, बी. बी. पाटील, समिती नेते नारायण कापोलकर, रमेश धबाले यांच्या हस्ते करण्यात आले. शस्त्रपूजन निरंजन सरदेसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी सदानंद पाटील, ईश्वर बोबाटे, प्रल्हाद मादार, मऱ्याप्पा पाटील, सुनील पाटील, प्रतिक देसाई यासह कार्यकर्ते उपस्थित होते. मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाने झांजपथक व लाठीमेळा प्रात्यक्षिके सादर केली. त्यानंतर पालखी मिरवणूक सुरू झाली. शहरातील पारंपरिक मार्गांवरून पालखी नेण्यात येऊन रात्री उत्सवाची सांगता करण्यात आली.
निलावडे येथे शिवजयंती उत्साहात

खानापूर : शिवाजी महाराजांचा आदर्श हेच आजच्या युवकांचे प्रेरणास्त्रोत आहे. यासाठी युवकांनी शिवाजी महाराजांच्या चरित्र्याचा सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे. शिवाजी महाराज हे जगातील आदर्श नेतृत्व तसेच रयतेच्या हितासाठी लोककल्याणासाठी स्वराज्याची स्थापना केली. स्वराज्य निर्मितीबरोबरच समाजपरिवर्तन त्यांनी घडविले, असे प्रतिपादन म. ए. समितीचे युवा नेते निरंजन सरदेसाई यांनी निलावडे येथे शिवजयंतीनिमित्त बोलताना व्यक्त केले. अध्यक्षस्थानी विठोबा निलावडे येथे प्रतिवर्षाप्रमाणे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. दुपारी 12 वा.शिवजन्मोत्सव पार पाडल्यानंतर शिवजयंतीचे आयोजन केले होते. यावेळी निरंजन सरदेसाई यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर भाषण केले. जि. पं. माजी सदस्य विलास बेळगावकर व जयराम देसाई यांनीही विचार व्यक्त केले. रमेश देसाई यांनी आभार मानले.









