अळवाज उपविजेता : राहुल अष्टपैलू खेळाडू
बेळगाव : इंचल, ता. बैलहोंगल येथील आरुढ स्पोर्ट्स क्लब आयोजित शिवानंद भारती मठ यांच्या यात्रेनिमित्त शिवबसव चषक निमंत्रितांच्या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत अंतिम सामन्यात इंडियन बॉईज स्पोर्ट्स क्लब मारीहाळ संघाने अळवाज मुडबिद्री संघाचा 2-1 अशा सेट्समध्ये पराभव करुन विजेतेपद पटकाविले. तर तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्यात मंगळूर संघाने हुबळीचा पराभव करुन तिसरे स्थान पटकाविले. अल्वाजच्या राहुलला अष्टपैलू खेळाडूंने गौरविण्यात आले. इंचल, ता. बैलहोंगल येथील शिवानंद भारती मठाच्या यात्रेनिमित्त भव्य निमंत्रितांच्या व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन शिवानंद भारती मठाचे स्वामीजी शिवानंद भारती यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व नेटवरील चेंडू सोडून करण्यात आले. यावेळी सीपीआय ए. एस. पाटीलसह अनेक मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत संपूर्ण राज्यातून 14 नामवंत संघांनी भाग घेतला होता. त्यामध्ये बेंगळूर, मंगळूर, म्हैसूर, कारवारसह धारवाड व बेळगावातील संघांचा सहभाग होता.
पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अळवाज मुडबिद्री संघाने हुबळी संघाचा 25-20, 25-15 अशा सेट्समध्ये तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इंडियन बॉईज मारीयाळ संघाने मंगळूर संघाचा 25-21, 25-22 अशा सेट्समध्ये पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. तिसऱ्या क्रमांकासाठी खेळविण्यात आलेल्या सामन्यात मंगळूर संघाने हुबळी संघाचा 15-12, 16-14, 15-11 अशा सेट्समध्ये पराभव करुन तिसरा क्रमांक पटकाविला. अंतिम सामन्यात इंडियन बॉईज मारीहाळ संघाने अळवाज मुडबिद्री संघाचा 25-22, 20-25, 15-13 अशा 2-1 सेट्समध्ये पराभव करुन विजेतेपद पटकाविले. सीपीआय पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांच्या हस्ते विजेत्या इंडियन बॉईज मारिहाळ संघाला 25 हजार रुपये रोख व आकर्षक चषक, उपविजेत्या अळवाज मुडबिद्री संघाला 15 हजार रुपये रोख व चषक तर तिसऱ्या क्रमांक पटकाविलेल्या मंगळूर संघाला 10 हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले. उत्कृष्ट लिफ्टर गौरेश (मंगळूर), उत्कृष्ट स्मॅशर राजेंद्र (हुबळी) तर अष्टपैलू खेळाडू राहुल (अळवाज) यांना चषक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेसाठी पंच म्हणून राष्ट्रीय पंच प्रकाश गुंडण्णावर, हर्षवर्धन शिंगाडे, राजू चौगला, उमेश मजुकर यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आरुढ स्पोर्ट्स क्लबच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.









