सुजित मिणचेकर हे उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या जवळचे असल्याचे जिल्हा प्रमुखपदावर काढून घेण्याला सुजित मिणचेकर हेच जबाबदार आहेत असा खळबळजनक आरोप मुरलीधर जाधव यांनी केला आहे. तसेच शिंदे गटामध्ये जाण्यासाठी माझ्यावर दबाव होता. त्यामुळेच माझा औद्योगिक वसाहतीमधील प्लॉट गेला असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच मी सध्या जात्यात असून तुम्हीही सुपात आहात असा इशारा ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांना मुरलीधर जाधव यांनी दिला आहे.
राजू शेट्टी यांच्यावर टिका केल्याने आपल्या जिल्हाप्रमुखपदाला मुकावे लागलेल्या मुरलीधर जाधव यांनी आज पत्रकार परिषद घेतली. आपल्या मनातील खंत त्यांनी बोलून दाखवताना पक्षश्रेष्टींनी माझं काय चुकलं अशी विचारणा केली. पक्षाने केलेल्या या कारवाईमुळे उद्वीग्न झालेल्या मुरलीधर जाधवांना आपले अश्रू अनावर झाले.
यावेळी बोलताना ते म्हणाले, “मी19 वर्षे पक्षासाठी काम केलं पण मला पदावरून पायउतार केलं. माजी आमदार सुजित मिणचेकर हे पदमुक्त करण्यासाठी पडद्यामागून काम करत होते. पक्षाशी गद्दारी करणारे तुम्हाला चालतात का ? नवीन आलेल्या उपनेत्या यांचे आणि मिणचेकर यांचे चांगले संबंध असल्यानेच माझ्यावर ही कारवाई झाली.”
पुढे बोलताना ते म्हणाले, “मी भावना माध्यमांसमोर मांडल्या तर काय चूक केली? पक्ष संकटात असताना सगळ्यात जास्त प्रतिज्ञापत्र मी दिले. असं असताना जर माझ्यावर कारवाई केली याचे दुःख वाटतं. मला किमान बोलवून तरी चूक सांगायला पाहिजे होती. मी उद्धव ठाकरे किंवा पक्षाबद्दल काहीही वाईट बोलणार नाही. मी उदय सामंत यांना भेटलो पण उद्धव ठाकरे यांची परवानगी घेऊनच भेटलो. मी शिंदे गटात गेलो नाही म्हणून माझा MIDC मधील एक कोटीचा प्लॉट काढून घेण्यात आला.” असे ते म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी MIDC मध्ये कोट्यवधींचा भुखंड घोटाळा असल्याचा खऴबळजक खुलासा केला, ते म्हणाले, “एमआयडीसीमध्ये कोट्यवधींचा भूखंड घोटाळा आहे. आणि त्यासाठी माजी आमदार सुजित मिणचेकर यांची टोळी काम करत आहे. सुजित मिणचेकर यांनीच मुरलीधर जाधव यांचा प्लॉट काढून घ्या त्याशिवाय तो शिंदे गटात येणार नाही. असं शिंदे गटाला सांगितले. त्यामुळे महाविकास आघाडीमधून तिकीट मिळालं तर मिणचेकर काय दिवस लावणार?” असा सवालही त्यांनी केला.