दक्षता विभागाकडून अमृतसरमध्ये कारवाई
वृत्तसंस्था/ अमृतसर
पंजाब दक्षता ब्युरोने शिरोमणी अकाली दलाचे (एसएडी) ज्येष्ठ नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री विक्रम मजिठिया यांना अटक केली आहे. दक्षता आणि पंजाब पोलिसांच्या संयुक्त पथकाने ड्रग्जविरोधी मोहिमेंतर्गत ही कारवाई केली आहे. भगवंत मान सरकारने पंजाबला ड्रग्जमुक्त करण्याची घोषणा करत हे अभियान राबवले जात आहे. पंजाब पोलीस आणि दक्षता ब्युरो यांच्या संयुक्त कारवाईअंतर्गत आतापर्यंत पंजाबमध्ये 25 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.
विक्रम मजिठिया यांच्या अटकेवरून पंजाबच्या राजकारणातील राजकीय वातावरण तप्त झाले आहे. मजिठिया यांची अटक आता एक राजकीय मुद्दा बनली आहे. अकाली दल याला सूडाची कृती म्हणत असताना, आम आदमी पक्षाने याला ड्रग्जविरुद्धचे युद्ध म्हटले आहे. मजिठिया यांच्याविरुद्ध ड्रग्ज प्रकरणाव्यतिरिक्त बेहिशेबी मालमत्तेचा खटला देखील सुरू आहे. अमृतसरमधील मजिठिया यांच्या घरासह अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. ‘पंजाब सरकार राजकारणाने प्रेरित होऊन ही कारवाई केली आहे. मी आजपर्यंत घाबरलो नाही आणि मी भविष्यातही झुकणार नाही’ असे छापेमारीनंतर मजिठिया म्हणाले.
काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनीही विक्रम मजिठिया यांच्यावर भ्रष्टाचार आणि ड्रग्ज रॅकेट चालवल्याचा आरोप केला होता. मजिठिया यांच्यावर बेहिशेबी मालमत्ता आणि भ्रष्टाचाराचे अनेक गुन्हे सुरू आहेत. ते पंजाबच्या राजकारणातील एक लोकप्रिय चेहरा असून यापूर्वी पंजाब सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीही होते.









