ता. पं. कार्यनिर्वाहक अधिकारी विरनगौडर एगनगौडर यांच्याकडून चौकशी : आवश्यक कागदपत्रे हस्तगत : आठवड्यात चौकशीचा अहवाल देणार
खानापूर : तालुक्यातील शिरोली ग्राम पंचायतीत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत या गैरव्यवहाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ग्राम पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सदस्यांनी केली होती. याबाबत शुक्रवार दि. 22 रोजी खानापूर तालुका पंचायतीचे कार्यनिर्वाहक अधिकारी विरनगौडर एगनगौडर यांनी शिरोली ग्रा. पं. ला भेट देवून आर्थिक गैरव्यवहाराबाबत सखोल चौकशी केली. आणि कागदपत्रे हस्तगत केली असून येत्या आठ दिवसात या गैरव्यवहाराबाबत आपला अहवाल ते देणार आहेत.
शिरोली ग्रा. पं.च्या माजी अध्यक्षा लक्ष्मी शिवाजी पाटील आणि विकास अधिकारी सुनंदा एन. यांनी संगनमताने आर्थिक गैरव्यवहार करून पंचायतीच्या मोठा निधी लाटल्याचा आरोप नूतन ग्रा. पं. अध्यक्षा निलम मादार, उपाध्यक्षा विद्या बुवाजी, सदस्य कृष्णा गुरव, सुभाष पाटील, महादेव शिवोलकर, दीपक गवाळकर, सदानंद पालकर आणि सदस्या गीता मादार, मॅगी पिंटो, वंदना नाईक यांनी लेखी निवेदन ता. पं. अधिकारी तसेच जिल्हा पंचायत कार्यनिर्वाहक अधिकारी हर्षल भोयर यांना चौकशी करून संबंधितांवर कारवाई करून गैरव्यवहाराची रक्कम पुन्हा पंचायत खात्यात जमा करण्यात यावी, अशी मागणी केली होती. या मागणीची दखल घेत ता. पं. कार्यनिर्वाहक अधिकारी विरनगौडर एगनगौडर यांनी शिरोली ग्रा. पं. ला शुक्रवारी दुपारी भेट देवून सर्व कागदपत्रांची पडताळणी केली. आणि आवश्यक कागदपत्रे हस्तगत केली आहेत. चौकशीदरम्यान विकास अधिकारी सुनंदा एन., माजी अध्यक्षा लक्ष्मी पाटील यासह नूतन अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सदस्य उपस्थित होते. यावेळी उपस्थित सदस्यांनी अधिकाऱ्यांकडे पुराव्यानिशी गैरव्यवहाराची माहिती दिली आहे.
याबाबत विरनगौडर एगनगौडर यांना विचारले असता आपण या गैरव्यवहाराची सखोल चौकशी करत असून आवश्यक कागदपत्रे हस्तगत केली आहेत. तसेच पुढील आठ दिवसात याबाबतचा अहवाल देणार असून ग्रा. पं. सदस्यांना याबाबत 27 सप्टेंबर रोजी बैठक घेऊन चर्चा करण्यात यावी, त्यानंतर आपण पुढील क्रम घेऊ, असे सांगितले. सदस्य कृष्णा गुरव म्हणाले, पीडीओंच्या वर्तनाला आम्ही अक्षरश: कंटाळलो आहोत. गैरव्यवहाराबाबत त्यांनी सदस्यांची दिशाभूल केली असून माजी अध्यक्ष आणि पीडीओ यांनी संगनमत करून मोठा गैरव्यवहार केला आहे. जर या गैरव्यवहाराची योग्य चौकशी होऊन लाटलेला निधी पुन्हा पंचायत खात्यात जमा करावा, तसेच पीडीओ सुनंदा यांची तातडीने बदली करावी, अन्यथा याबाबत आम्ही लोकायुक्तांकडे तक्रार दाखल करणार आहोत.
विकास अधिकाऱ्यांकडून अरेरावीची भाषा-असहकार्याचा आरोप
याबाबत विकास अधिकारी एन. सुनंदा यांना विचारले असता त्यांनी कोणतेही उत्तर देण्यास नकार दर्शवत पंचायतीतून काढता पाय घेतला. याबाबत अध्यक्षा नीलम मादार म्हणाल्या, विकास अधिकारी एन. सुनंदा कायमच सदस्यांबरोबर अरेरावीची भाषा करतात. तसेच कोणत्याही बाबतीत सहकार्य करत नाहीत. तसेच सदस्यांना धमकावत असतात. त्यामुळे सदस्यही तणावाखाली वावरत आहेत. तेराव्या वित्त आयोगातील निधी तसेच सदस्यांचा नऊ महिन्याच्या मानधनाचा निधी तसेच निधी टू मधील रक्कम अध्यक्ष, पीडीओ, विकास अधिकारी यांनी संगणमत करून लाटलेला आहे. यापूर्वी हा निधी पुन्हा पंचायत खात्यावर जमा करण्याची सूचना केली होती. मात्र या सूचनेचा विचार न करता अरेरावीची भाषा केल्याने आम्ही चौकशीची मागणी केली. त्यानुसार ही चौकशी सुरू आहे.









