शिरोळ,प्रतिनिधी
सुभाष तानाजी बोरगावकर वय वर्ष 75(रा- कुरुंदवाड) यांच्या खिशातील 22 500 रुपये बळजबरीने लंपास करणाऱ्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार राजू बादशाह मुल्ला (वय- 45 वर्षे) रा-शंभरफुटी रोड सांगली यास शिरोळ पोलिसांनी अटक केली. तसेच एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसातून मिळालेली सविस्तर माहिती अशी की, 27 जून रोजी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास शिरोळ जयसिंगपूर मार्गावरील के.पी. टी नजीक श्रीनगर कॉलनी येथे रस्त्यावर सुभाष बोरगावकर हे वयोवृद्ध एसटीची वाट पहात थांबले होते. यावेळी यातील संशयित आरोपी राजू बादशाह मुल्ला हा आपल्या ताब्यातील मारुती एट हंड्रेड ही गाडी थांबवून बोरगावकर यांना कुरुंदवाडला येणार का असे विचारून त्यांना गाडीत बसवून घेतले. त्यानंतर मुल्ला याने बोरगावकर यांना पुढे पोलीस तपासणी करीत आहेत तुमच्या खिशात नशेच्या गोळ्या आहेत का असे विचारून बोरगावकर यांच्या खिशातील पंचवीस हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यापैकी पाचशे रुपयांच्या पाच नोटा बोरगावकर यांच्या जेवणाच्या डब्यात टाकून त्यांना गाडीतून जबरदस्तीने बाहेर ढकलून दिले. उरलेले 22,500 रुपये घेऊन पोबारा केला याबाबतची फिर्याद बोरगावकर यांनी शिरोळ पोलीस ठाण्यात दिली होती.
शिरोळ पोलीस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकामधील पोलीस हवालदार सागर पाटील,अभिजीत परब, गजानन कोष्टी, संजय राठोड, रहमान शेख यांनी सदर गुन्ह्याचा तपास करत असताना सीसीटीव्हीच्या फुटेज वरून केपीटी परिसरातील व सांगली परिसरातील कॅमेरे तपासून संशयित आरोपी मुल्ला याने गुन्ह्यात वापरलेले वाहन निष्पन्न केले. तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारावरून शंभरफूटी रोड सांगली येथील राजू बादशाह मुल्ला यास अटक करून त्याच्याकडील वाहन जप्त केले. व गुन्ह्यामधील लंपास केलेली 22500 रुपये रक्कम हस्तगत केली. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता राजू मुल्ला हा रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार असून त्याचे विरोधात जबरी चोरी, सरकारी कामात अडथळा आणणे, फसवणूक करणे यासह अन्य गुन्हे पुणे,सातारा, कराड, सांगली येथील पोलीस ठाण्यात दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याकडून अन्य गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित,अतिरिक्त पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, पोलीस उपाधीक्षक डॉ. रोहिणी साळंके, पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगीड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भोजने, विलास कुरणे यांच्यासह गुन्हे शोध पथकाने केली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार सागर पाटील हे करीत आहेत.









