शिराळा :
शिराळ्यात न्यायालयाच्या आदेशानुसार व पारंपरिक वाद्यांच्या गजरात नागपंचमी सण उत्साहात साजरा करण्यात आला. सोहळ्याला भाविकांनी गर्दी केली होती. शैक्षणिक उद्देशासाठी शिराळा येथील २१ जणांना जिवंत नाग पकडण्याची परवानगी शासनाने दिली. त्यामुळे तब्बल २३ वर्षांनी बहिणींनी नागराजाचं दर्शन घेऊन उपवास सोडला आणि शिराळकर आनंदल्याचे दिसून आले.
सरकारच्या निर्णयामुळे नागपंचमी उत्सवासाठी येणाऱ्या भाविकांनाही अंबामातेच्या मंदिरामध्ये नागराजाचं दर्शन घडले. एकवीसजणांना प्रबोधनासाठी वेगवेगळी ठिकाणे दिली होती. तर शिराळा येथील महिलांनी प्रबोधन करण्यासाठी प्रथमच मंडळाची स्थापना करून शहरातून पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढली.
शेकडो वर्षापासून शिराळा येथील महिला भगिनी नागपंचमीच्या आदल्या दिवशी उपवास करतात व दुसऱ्या दिवशी नागाची पूजा केल्यानंतरच उपवास सोडतात. परंतु ही परंपरा गेल्या २३ वर्षांपासून न्याय प्रविष्ट आहे. त्यामुळे येथील महिला भगिनी नागाच्या मूर्तीच्या प्रतिमेचे पूजन करून उपवास सोडत असत. परंतु नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण, वन आणि जलवायु परिवर्तन मंत्रालय, वन्यजीव विभाग नवी दिल्ली यांच्याकडून एकवीस जनांना शैक्षणिक उद्देशासाठी व वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, अन्वये अभ्यास, शिक्षण करण्यासाठी नाग पकडण्यास मंजुरीबाबत २७ ते ३१ जुलै २०२५ या कालावधीत अटी शर्तीस अधिन राहून परवानगी दिली. यामध्ये व्यावसायिक किंवा मनोरंजन, स्पर्धा, मिरवणूक, खेळ, याला अटकाव करण्यात आलेला आहे.

दरम्यान, मंगळवारी सकाळपासूनच अंबामातेच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. ग्रामस्थांसह तरुणाईमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
सर्व नाग मंडळांनी सकाळीच पारंपरिक वाद्यांच्या गजरात अंबामातेचे व मरिआई देवीचं दर्शन घेऊन मिरवणुकीला सुरुवात झाली. शहरात पोलीस व वनविभागाने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. शहरात व मंदिर परिसरात विविध खेळ, खेळण्याची स्टॉल, मेवा मिठाईची दुकाने लहान मुलांचे खेळण्याचे स्टॉल, मोठमोठे पाळणे मोठ्या प्रमाणात आले आहेत.
आमदार सत्यजित देशमुख, माजी आमदार मानसिंगराव नाईक, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, सम्राट महाडिक, जिल्हाध्यक्ष विराज नाईक, यशवंत ग्लुकोजचे चेअरमन रणधीर नाईक, पृथ्विसिंग नाईक यांनी अनेक मंडळांच्या मिरवणुकींची उद्घाटने केली व नाग मंडळांना भेटी देऊन शुभेच्छा दिल्या.
तर नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून उपविभागीय अधिकारी, पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक, अंमलदार, कर्मचारी ३४२ यांच्यासह मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवला होता. उपवनसंरक्षक अधिकारी एक, उपविभागीय वनाधिकारी एक, सहायक वनसंरक्षक अधिकारी सहा, वनपाल २०, वनरक्षक ३८, वनमजूर ५४, पोलिस कर्मचारी १० असा मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
वनविभाग प्रशासनाकडून १५० अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली होती. शहरात विविध ठिकाणी तपास नाके उभारले होते. आरोग्य विभागामार्फत वैद्यकीय पथके तैनात होती. तसेच आरोग्य विभागामार्फत आवश्यक औषधांचा साठा व सर्पदंशाची लसी उपलब्ध केल्या. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तसेच नागपंचमी दिवशी वाहतूक सुरळीत राहावी किंवा गर्दीमध्ये वाहने घुसू नयेत यासाठी सुरक्षिततेसाठी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला होता.
पेठ नाका ते शिराळा पर्यंतच्या वाहतुकीची येणारी वाहने आशियाई राष्ट्रीय महामार्ग क्र ४ पेठ नाका मार्गे तर शिराळ्यात कडून आशियाई महामार्गाकडे जाणारी वाहने बायपास रस्ता मार्गे कापरी, कार्वे, ढगेवाडी, ऐतवडे बुद्रुक, लाडेगाव, वशी, येडेनिपाणी फाटा या मार्गाने आशियाई मार्गाकडे वळवली होती. दुपारी एक ते रात्री बारा पर्यंत शिराळा बायपास येथून पेठ नाक्याकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंदी घालण्यात आली होती.
तहसीलदार शामला खोत-पाटील, पोलीस निरीक्षक सिध्देश्वर जंगम, वनक्षेत्रपाल महंतेश बंगले, मुख्याधिकारी योगेश पाटील, सहायक पोलिस निरीक्षक जयसिंगराव पाटील यांनी मिरवणूक मार्गाची पाहणी करून सूचना केल्या. यावर्षीची मिरवणूक उत्साहात व आनंदात साजरी झाली.








