शिराळा, वार्ताहर
Shirala Nag Panchami Celebration : न्यायालयाच्या आदेशानुसार व पारंपारिक वाद्यांच्या गजरात शिराळ्यात नागपंचमी सण उत्साहात पार पडला. यावेळी लाखो भाविकांनी गर्दी केली होती. आज सकाळपासूनच अंबामातेच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. ग्रामस्थांसह तरुणाईमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
सर्व नाग मंडळांनी सकाळीच पारंपरिक वाद्यांच्या गजरात अंबामातेचे व मरिआई देवीचं दर्शन घेऊन नागाच्या प्रतिमेचे पारंपरिक पद्धतीने पूजन केले. बाराच्या सुमारास मिरवणूकीला प्रारंभ झाला. दुपारी एक वाजता आमदार मानसिंगराव नाईक, सुनिता देवी नाईक, तहसीलदार शामला खोत-पाटील, सुमंत महाजन, सुखदा महाजन यांच्या हस्ते महाजन यांच्या मानाच्या पालखीचे पुजन करून सदर पालखी महाजन गल्ली, गुरुवार पेठ मार्गे सोमवार पेठ मधून अंबामाता मंदीरात नेण्यात आली. यावेळी मानकरी श्रेयश महाजन, प्रणव महाजन, सुमंत महाजन, रामचंद्र महाजन, पांडुरंग महाजन,धिरज महाजन, यश महाजन, अनिवृध्द महाजन, शालिनी महाजन उपस्थित होते. परिसरात दिवसभर ड्रोनचा व सीसीटीव्हीचा वाॅच ठेवण्यात आला होता. श्वान पथक तैनात करण्यात आले होते. शहरात पोलीस प्रशासनाने व वनविभागाने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
नाग मंडळांच्या कार्यकर्त्यांनी सकाळच्या सुमारास नागाच्या प्रतिमेचे पुजन करून, पारंपरिक वाद्यांच्या गजरात आंबामातेचे दर्शन घेतले. शहरात मंदिर परिसरात विविध खेळ, खेळण्याची स्टॉल, मेवा मिठाईच्या दुकानांनी परिसर गजबजला आहे.याचबरोबर शहरात नागमंडळांस विविध पक्ष संघटनेच्या कार्यकर्त्यांचे बॅनर चौकाचौकात झळकू लागले आहेत.
आमदार मानसिंगराव नाईक, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, जिल्हा बँकेचे संचालक सत्यजित देशमुख, सम्राट महाडिक, जिल्हाध्यक्ष विराज नाईक, यशवंत ग्लुकोजचे चेअरमन रणधीर नाईक यांनी अनेक मंडळांच्या मिरवणुकींची उद्घाटने झाले. यावेळी नाग मंडळांना भेटी दिल्या.नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर वनविभागाच्या विभागीय वनाधिकारी दिलीप भुरके, उपवनसंरक्षक नीता कट्टे, सहाय्यक वनसंरक्षक डॉ. अजित सांजने, डॉ सुनील लाड ,कमलेश पाटील , महेश झाणझुरने , इंद्रजित निकम , रणजित गायकवाड , पाच सहाय्यक वनसंरक्षक, २० वनक्षेत्रपाल , २० वनपाल , ४८ वनरक्षक , ५४ वनमजूर असे जवळपास १३५ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तर अनेक ठिकाणी तपासणी नाके उभारण्यात आले होते.
शहरात पोलिस प्रशासनाकडून एक आयपीएस अधिकारी राहूल चव्हाण, पोलिस उपविभागीय अधिकारी मंगेश चव्हाण व मनिषा कदम, पोलिस निरीक्षक १०, सहायक पोलिस निरीक्षक ३५, पुरूष पोलिस कर्मचारी ३५५ , महीला पोलिस कर्मचारी ५० , असे एकूण कर्मचारी ४०५ , वाहतूक पोलीस कर्मचारी ४०, ध्वनीमाफक यंत्र १२, व्हिडिओ कॅमेरे १४, दंगलविरोधी पथक एक तर घातपात पथक एक, श्वान पथक एक असे पाचशेहून अधिक पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.आरोग्य विभागामार्फत आवश्यक औषधांचा साठा व सर्पदंशाच्या लसी मोठ्या प्रमाणात उपलब्ध केल्या होत्या. अकरा रुग्ण वाहिकांची व्यवस्था करण्यात आली होती. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण नागपंचमी उत्सवावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच होता.
नागपंचमी दिवशी वाहतूक सुरळीत राहावी किंवा गर्दीमध्ये वाहने घुसू नयेत यासाठी सुरक्षिततेसाठी वाहतूक व्यवस्थेत व मार्गात बदल करण्यात आला होता. पेठ नाका ते शिराळा पर्यंतच्या वाहतूक मार्गात बदल केला असून, आशियाई राष्ट्रीय महामार्ग क्र ४ पेठ नाका मार्गे येणारी वाहने येतील शिराळ्याकडून आशियाई महामार्गाकडे जाणारी वाहने बायपास रस्ता मार्गे कापरी, कार्वे, ढगेवाडी, ऐतवडे बुद्रुक, लाडेगाव, वशी, येडेनिपाणी फाटा या मार्गाने आशियाई मार्गाकडे जातील दुपारी एक ते रात्री बारा पर्यंत शिराळा बायपास येथून पेठ नाक्याकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली होती.तहसीलदार शामला खोत-पाटील, पोलीस निरीक्षक सिध्देश्वर जंगम, वनक्षेत्रपाल महंतेश बंगले, मुख्याधिकारी योगेश पाटील, सहायक पोलिस निरीक्षक जयसिंगराव पाटील यांनी मिरवणूक मार्गाची पाहणी करून सुचेना केल्या. यावर्षीची मिरवणूक उत्साहात व आनंदात साजरी झाली.