शिराळा/प्रतिनिधी
शिराळा कोर्टात मनसे अध्यक्ष राज ठाकरे व शिरीष पारकर यांची गुन्ह्यातून मुक्त करण्याचा अर्ज नामंजूर करण्यात आला आहे.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे व शिरीष पारकर यांच्यावतीने न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता की, सदर गुन्हा घडतेवेळी ते दोघेही उपस्थित नव्हते, तर ते अन्य गुन्ह्याच्याकामी अटकेत होते. त्यांच्याविरुध्द केस चालविण्याइतपत पुरावा नाही. त्यामुळे त्यांची सदर गुन्ह्यातून मुक्तता करण्यात यावी असा अर्ज केला होता. सदर अर्जास सरकार पक्षातर्फे सरकारी वकील संदीप पाटील यांनी हरकत घेतली की, सदर गुन्हा हा त्यांनी केलेल्या प्रक्षोभक भाषणामुळे घडला आहे. सदर गुन्ह्यास त्यांनी परावृत्त केल्यामुळे आरोपींनी शेडगेवाडी फाटा येथे बंद पुकारला व परप्रांतीय लोकांच्या रेल्वेमध्ये होत असलेल्या भरतीचा विरोध केला. त्यामुळे व्यापाऱ्यांना बंद पाळावा लागला. या गुन्ह्यात त्यांचा सकृतदर्शनी सहभाग असून त्याकरिता न्यायालयात खटला चालविणे गरजेचे आहे. त्यामुळे सदरचा अर्ज नामंजूर व्हावा.
हे ही वाचा : 7 नोव्हेंबर ला पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयावर धडक, राजू शेट्टीची घोषणा
दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून व उपलब्ध पुराव्याच्या आधारे त्यांचा अर्ज प्रीती अ. श्रीराम प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी शिराळा यांनी नामंजूर केला. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील संदीप पाटील यांनी बाजू मांडली. दोषारोप ठेवण्याकरिता पुढील तारीख सहा डिसेंबर दिली आहे.