बसस्थानक, वीज वितरण दोघांच्या वादात कर्मचारी व प्रवाशांची अवस्था बिकट
प्रितम निकम/शिराळा
ऐन उन्हाळ्यात गेल्या आठवड्यापासून शिराळा बसस्थानक लाईट व पाण्याविना व्याकूळ झाले आहे. वारंवार तक्रारी करुन ही वीज वितरण कंपनीचे अधिकारी लक्ष देत नाहीत, असा आरोप बसस्थानक प्रशासन अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. तर बसस्थानकामधील कर्मचारी तेथील झाडांच्या फांद्या तोडत नाहीत म्हणून आम्ही दुर्लक्ष करत आहे, असे महावितरणने म्हटले आहे. त्यामुळे दोघांच्या वादात कर्मचारी व प्रवाशांची अवस्था दैनिय झाली आहे.
गेल्या आठवड्यापूर्वी शिराळा शहरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला होता. त्यावेळी झाडांची फांदी पडून शिराळा बसस्थानकामधील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. आठवडाभराच्या कालावधीत एसटी प्रशासनाने वारंवार तक्रार करूनही याची दखल वीजवितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घेतलेली नाही. त्यामुळे शिराळा बस स्थानकातील प्रवाशांचे व कर्मचाऱ्यांचे ऐन उकाड्यात हाल होतं आहेत.
तर बसस्थानकामधील पाण्याची टाकी उंचावर असल्यामुळे विद्युत मोटर शिवाय टाकीत पाणी भरता येत नाही. लाईट नसल्याने विद्युत मोटर चालू करता येत नाही . त्यामुळे आठ दिवस झाले बसस्थानकात पाण्याचा थेंब नाही. स्वच्छता गृहात घानीचे साम्राज्य पसरले आहे.
तसेच कोरोना काळापासून बसस्थानक अडचणीत वाटचाल करत आहे. लाईट नसल्याने वर्कशॉपमधील कामे करण्यासाठी सध्या दिवसभर जनरेटर चालू ठेवावा लागत आहे. डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. वीज बिल भरुन ही वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे जनरेटर दररोज १६ ते १७ तास चालू ठेवावा लागत आहे. पंचवीस ते तीस लिटर डिझेल खर्च म्हणजे जवळपास ३०००हजार रुपयांच्या खर्चाचा बोजा एसटी प्रशासनाला सोसावा लागत आहे.
तरी कर्मचाऱ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यामुळे दुपारच्या जेवणासाठी घरातून पाणी आणावे लागत आहे. बाहेरुन येणाऱ्या प्रवाशांना मात्र पाणी विकत घेऊन पिण्याशिवाय पर्याय नसुन वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधला असता अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देऊन हात वर करत आहेत.