कोल्हापूर / धीरज बरगे :
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शिंगणापूर उपसा केंद्रातील पाणी उपसा यंत्रणा बदलण्याचे काम पूर्ण झाले आहे. शहरातील ए, बी आणि ई वॉर्डला पाणीपुरवठा करणारे हे उपसा केंद्र पूर्ववत सुरु होणार असल्याने शहरवासियांना आता पाणी टंचाईचे टेन्शन घ्यावे लागणार नाही. थेट पाईपलाईन योजनेत काही कारणास्तव बिघाड झाला तरीही आता शहराला नियमित पाणीपुरवठा होणार आहे.
शिंगणापूर उपसा केंद्र पूर्ववत सुरु होत असल्याने शहराला पाणी पुरवठ्यासाठी पर्यायी यंत्रणा उपलब्ध झाली आहे. कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी शिंगणापूर उपसा केंद्रातून सुमारे 100 दशलक्ष लिटर (एमएलडी), नागदेववाडी केंद्रातून 40 आणि बालिंगा येथून 60 एमएलडी पाणी उपसा केला जात होता. पण शहराला मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी महत्त्वकांक्षी अशी काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना सुरु झाली. काळम्मावाडी योजनेतून शहराला 165 एमएलडी पाणीपुरवठा होतो. थेट पाईपलाईन योजना सुरु झाल्यानंतर शिंगणापूर पाणी उपसा केंद्रातील उपसा यंत्रणा बदलण्यासाठी येथील पाणी उपसा बंद केला होता.
काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेद्वारे शहराला शुद्ध व मुबलक पाणीपुरवठा सुरु होता. मात्र या योजनेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पाईप लाईनला गळती लागणे, व्हॉल्व चोरीला जाणे, विद्युतपुरवठा खंडीत होणे अशा कारणांमुळे थेट पाईपलाईन योजनेतून शहराला होणारा पाणीपुरवठा वारंवार खंडित होत आहे. यामध्ये शिंगणापूर येथील उपसा केंद्रही बंद असल्याने शहरवासियांवर अनेक वेळा पाणीबाणीची परिस्थिती ओढवत होती. जलसमृद्ध जिल्हा असूनही पाणी टंचाईशी सामना करावा लागत असल्याने शहरवासियांमधून संताप व्यक्त होत होता.
थेट पाईपलाईन योजनेतील तांत्रिक अडचणी लक्षात घेता शहराला एक पर्यायी पाणीपुरवठा करणारी यंत्रणा उपलब्ध असावी, या दृष्टीकोनातून शिंगणापूर उपसा केंद्रातील उपसा यंत्रणा बदलण्याचे काम महापालिका प्रशासनाने हाती घेतली. हे काम आता जवळपास पूर्ण झाले आहे. गुरुवार 10 रोजी जलअभियंता हर्षजीत घाटगे यांनी या कामाची पाहणी केली. तसेच येथील ट्रान्सफार्मर बदलण्याचे कामही पूर्ण झाले असुन त्याची यशस्वी चाचणी घेण्यात आली. त्यामुळे पाणीपुरवठ्यासाठी आता शिंगणापूर उपसा केंद्राचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
- पाणी उपसाचे आज टेस्टिंग
येथील ट्रान्सफार्मरची चाचणी यशस्वी झाली आहे. यानंतर आज 11 रोजी शिंगणापूर उपसा केंद्रातील उपसा पंपांचे टेस्टिंग करत पाणी उपसा केला जाणार आहे. त्यामुळे शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी शिंगणापूरचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
- पाणी टंचाईचे प्रमाण कमी होईल
दुरुस्तीसह इतर कारणाने शहराचा पाणीपुरवठा खंडीत होऊ नये यासाठी महापालिका काळम्मावाडी आणि शिंगणापूर अशा दोन्ही यंत्रणा कार्यान्वित ठेवणार आहे. शिंगणापूर येथील उपसा यंत्रणा बदलण्याचे काम पूर्ण झाले आहे. पाणी पुरवठ्यासाठी पर्यायी यंत्रणा उपलब्ध झाल्याने शहरातील पाणी पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण कमी होणार आहे.
– हर्षजीत घाटगे, जलअभियंता महापालिका.
- शहराला पाणीपुरवठा करणारे उपसा केंद्र व प्रतिदिन होणारा पाणी उपसा पुढील प्रमाणे :
उपसा केंद्राचे नाव होणारा पाणी उपसा (एमएलडीमध्ये)
काळम्मावाडी 165
शिंगणापूर 80 ते 100
बालिंगा 60
नागदेववाडी 40








