भंडाऱ्याच्या उधळणीत देवीच्या रथाची भव्य मिरवणूक : तब्बल 15 वर्षांनी यात्रा भरल्याने भाविकांची अमाप गर्दी
वार्ताहर/सांबरा
शिंदोळी (ता. बेळगाव) येथील श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला असून बुधवारी आयोजित रथोत्सवामध्ये हजारो भाविकांनी भाग घेतला. भंडाऱ्याची उधळण करत व देवीचा जय जयकार करत गावामध्ये रथाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. तब्बल पंधरा वर्षांनी होत असलेल्या श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेची ग्रामस्थांनी जय्यत तयारी केलेली आहे. ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या असून गदगेच्या ठिकाणी म्हैसूर पॅलेसची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली आहे. तर गावातील सर्व मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंगळवारी पहाटे धार्मिक विधी झाल्यानंतर अक्षतारोपणाने यात्रेला सुरुवात झाली.
श्री महालक्ष्मी मंदिरचे लोकार्पण
मंगळवारी नूतनीकरण केलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. खासदार जगदीश शेट्टर यांच्या हस्ते फीत कापून मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. दरम्यान दिवसभरात माजी मंत्री व गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी व अनेक मान्यवरांनी भेट देऊन श्री लक्ष्मीदेवीचे दर्शन घेतले.
आकर्षक रथोत्सव
बुधवारी सकाळी आठ वाजता कारंजीमठाचे गुरुसिद्ध स्वामीजी व काँग्रेस युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांच्या हस्ते पूजन करून रथोत्सवाला प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर सर्व गावातून रथाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. भंडाऱ्याची उधळण करत श्री लक्ष्मीदेवीचा जयजयकार करत भाविक रथोत्सवात दाखल होत होते. तर देवीचे ठिकठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले. दुपारनंतर काहीवेळ जोरदार पाऊसही झाला. मात्र पावसाची तमा न बाळगता भाविकांनी रथोत्सवात भाग घेतला. सायंकाळी लक्ष्मीदेवी गदगेवर विराजमान झाली. येथील श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेसाठी सीबीटी येथून राज्य परिवहन मंडळाने जादा बसेसचीही सोय केली आहे. बुधवार दि. 30 पर्यंत यात्रा सुरू राहणार असून यात्रेदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.









