ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथ घेवून काही तास उलटले तोच त्यांनी कामाचा धडाका लावला आहे. शिंदेंनी नाशिक जिल्हा नियोजन समितीच्या 567 कोटींच्या कामांना ब्रेक लावत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना दणका दिला आहे. तसेच इतक्या घाईगडबडीत कामांना मंजुरी कशासाठी? असा सवाल शिंदेंनी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना केला आहे.
भुजबळ पालकमंत्री असताना त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विकासकांसाठी 567 कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली होती. नाशिक जिल्ह्यातील रस्ते दुरुस्ती- पुनर्बांधणी, बंधारे दुरुस्ती, याच बरोबर लोक प्रतिनिधी, जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त विकास कामांचे प्रस्ताव, जिल्हा परिषद, जिल्हा विभागाकडे आलेले विकासकामांचे प्रस्ताव या सर्वांना विचारात घेऊन सर्व तालुक्यांना समान निधीचे वाटप करण्यात यावे, आशा सूचना भुजबळ यांनी या बैठकीत केल्या होत्या.
मात्र, निधी वाटपावरुन आमदार सुहास कांदे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली होती. दरम्यान, शिंदे यांचं सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी तत्काळ हा निधी गोठवला. आता नव्या मंत्रीमंडळाच्या मंजुरीने ही कामं मार्गी लागतील, असे सांगण्यात येत आहे.