पुणे / प्रतिनिधी :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेतील सत्तासंघर्ष तीव्र झाला असतानाच मुंबईप्रमाणेच पुण्यातून शिंदे गटाचे कामकाज शिवसेना भवनातून चालणार आहे. सारसबाग परिसरात शिंदे गटाकडून एका इमारतीमध्ये प्रति शिवसेना भवनाचे काम सुरू करण्यात आले आहे. ‘बाळासाहेब ठाकरे शिवसेना भवन’ असे त्याचे नामकरण करण्यात आले असून, नव्या वर्षापासून या शिवसेना भवनातून प्रत्यक्ष कामकाज सुरू करण्यात येईल, असा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे.
पुण्याच्या मध्यवर्ती भागातील काही जागांची पाहणीही शिंदे गटाकडून करण्यात आली होती. प्रति शिवसेना भवनासाठी सारसबाग येथील इमारतीमधील जागा निश्चित करण्यात आली आहे.
याबाबत शिंदे गटाचे नाना भागगिरे म्हणाले, पुण्यात प्रति शिवसेना भवन उभारले जाईल असे जाहीर केले होते. राज्य आणि केंद्र सरकार तसेच महापालिकेच्या विविध योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांचे कामकाज शिवसेना भवनातून केले जाईल. या भवनाला बाळासाहेब ठाकरे शिवसेना भवन असे नाव देण्यात आले असून सध्या स्थापत्यविषयक कामे सुरू आहेत. हे भवन चार हजार चौरस फूट जागेत असून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी चोवीस तास कार्यकर्ते येथे असणार आहेत.
अधिक वाचा : संमेलनाध्यक्षपदासाठी मसापकडून द्वादशीवार, दवणे, गोडबोले यांची नावे
सध्या सुरू असलेली कामे अंतिम टप्प्यात आली असून, डिसेंबरपर्यंत ती पूर्ण होतील आणि नव्या वर्षापासून बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे काम या भवनातून सुरू होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भवनाचे उद्घाटन करण्याचे नियोजित असल्याचेही भानगिरे यांनी सांगितले.








