ऑनलाईन टीम/तरुण भारत
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या आरोप-प्रत्यारोपांसोबतच एकमेकांना चिमटे काढणे, खोचक टोलेबाजी करणे अशा गोष्टी देखील अधिवेशनात पाहायला मिळत आहेत. यातच शिंदे-फडणवीस सरकार फार काळ राहणार नाही, हे मी आधीपासूनच सांगतोय. सरकारमधील काही जण नाराज आहेत, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. (Shinde Fadnavis government will not last long says congress leader nana patole)
महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची मंगळवारी संध्याकाळी बैठक होणार आहे. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह अजित पवार (Ajit Pawar), अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, छगन भुजबळ यांच्यासह सर्वच प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीवरही नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “महाविकास आघाडीच्या बैठकीत विविध प्रश्नांवर चर्चा होणार आहे. ज्यामध्ये मुंबईच्या ट्रॅफिक पोलिसांना दहशतवाद्यांचे मेसेज आले, रायगडला शस्त्रसाठा मिळाला, भाजप अधिक इडी सरकारला जाब विचारणे, शेतकरी गरीब जनतेचे प्रश्न कसे मार्गी लागतील याकडे लक्ष देणे अशा विविध प्रश्नांवर बैठकीत चर्चा होणार आहे”, असे पटोले म्हणाले.
दरम्यान, राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनच्या चौथ्या दिवशी देखील विरोधकांनी विधानभवन परिसरत घोषणाबाजी करत दणाणून सोडला आहे. विरोधकांनी आज ५०-५० बिक्सिटचे पॅकेट दाखवत ’५०-५० चलो गुवाहाटी’ अशा अनोख्या पद्धतीने नारेबाजी केली. यावेळी ओला दुष्काळ जाहीर करा, अशी आग्रहाची मागणी विरोधकांनी केली. याशिवायआले रे आले गद्दार आले, विकास कामांना स्थगिती देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, 50 खोके, खाऊन माजलेत बोके, ईडी सरकार हाय, हाय, सीबीआय सरकार हाय, हाय अशा घोषणा विरोधकांनी दिल्या आहे.