ते गब्बरसिंग जिल्हा लुटायला आल्याचा केला आरोप
सातारा प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसमधील कोणीही कुठे जाणार नाही असे पवारसाहेबांनी सांगितले आहे. मात्र, शिंदे गटाचे 16 आमदार शंभर टक्के डिस्कॉलीफाय होणार आहेत. हे सरकार बरखास्त होणार आहे. त्यांची आमदारकी रद्द होणार आहे. त्यांना सहा वर्ष आमदारकी लढवता येणार नाही, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे सदस्य आमदार शशिकांत शिंदे यांनी केला. दरम्यान, त्यांनी मला त्यांनी आरसाणी म्हटले मी त्यांना शोलेतला गब्बरसिंग म्हणालो. गब्बरसिंग हा गाव लुटायला यायचा. तसे ते जिल्हा लुटायला आले आहेत, असा आरोप आमदार महेश शिंदे यांचे नाव न घेता केला आहे.
साताऱ्यात ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष रमेश उबाळे, युवा नेते कामेश कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, पवारसाहेबांनी सांगितले आहे की राष्ट्रवादीतले कोणीही फुटणार नाही. शिंदे गटाचे 16 आमदार शंभर टक्के डिस क्वॉलिफाय होणार आहेत. शिंदे – फडणवीस सरकार बरखास्त होणार आहे. त्यांची आमदारकी रद्द होणार आहेत. सहा वर्ष त्यांना आमदारकी लढवता येणार नाही. मग आता सरकार अस्थिर होणार असल्याने अशा वावडय़ा उठत असतात हे येणार ते येणार. लोकशाहीच्या माध्यमातून तुमच्यात दम असेल तर लगेच निवडणूका जाहीर करा. तुम्ही करु शकत नाही. तुम्हाला कॉन्फीडन्स नाही. तुमच्या दिल्लीच्या यंत्रणेलाही माहिती मिळालेली आहे. तुमचे खासदार 10 ते 12 च्या वर निवडून येणार नाहीत. तुमची आमदारकी धोक्यात आलेली आहे. या झालेल्या प्रक्रियेत महाराष्ट्रात प्रचंड नाराजीचा सुर आहे. त्याचा परिणाम म्हणून तुम्ही निवडणूका घेवू शकत नाही. राष्ट्रपती राजवट लागू करायची तर सहा महिने आधी करावी लागते. लोकसभेला अजून एक वर्ष मुदत संपण्यास आहे तर विधानसभेला दीड वर्ष कालावधी आहे. त्यामुळे तुम्हाला राष्ट्रपती राजवट लागू करता येत नाही. मग काय करायचे तर सत्तेचा गैरवापर. जो राज्याराज्यात होतो आहे. मग दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर केला जातो. बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांवर केला जातो. महाराष्ट्रात करताय. चौकशा लावता आहात. हे फार काळ चालत नसते, असे परखड मत आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले.
मला आसरणी म्हणाले तर ते गब्बरसिंग
आमदार महेश शिंदे हे आसराणी तुम्हाला म्हणाले आहेत असे पत्रकारांनी विचारणा केल्यावर त्यावर आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, एखाद्याला स्वतःची भिती वाटायला लागते. तेव्हा तो कलाकारांची नावे घेतो किंवा कलाकारांचा आसरा घेतो. त्यांच्या दृष्टीने मी आसराणी जरी असलो तरी मी त्यांना गब्बरसिंग म्हणालो आहे. गब्बरसिंग गाव लुटायला यायचा हा तर जिल्हाच लुटायचा प्रयत्न करतो आहे. मस्ती आणि हुकूमशाही फार काळ चालत नाही. देशात पण चालत नाहीत, राज्यात पण नाही आणि जिह्यात पण चालत नाही. येथे पण चालत नाही. लोक स्वाभिमानी आहेत, अशी टीप्पणी त्यांनी केली.








