ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राज्यात एक पक्ष मोडून-तोडून शिंदे-फडणवीस सरकार बनवण्यात आले आहे. हे सरकार अनैतिक आहे, अशा शब्दात भाजप नेते व माजी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी भाजपला घरचा आहेर दिला. दरम्यान, स्वामी यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
सुब्रमण्यम स्वामी यांनी आज पंढरपुरात आले होते. तिथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र डागलं. महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार अनैतिक आहे. एका पक्षाची मोडतोड करुन हे सरकार बनवण्यात आलं आहे. त्यांचं प्रकरण कोर्टात प्रलंबित आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर कॉरिडॉर लवकरच करणार असल्याची घोषणा केली आहे. पण आम्ही ते होऊ देणार नाही. या प्रकरणात फडणवीस यांनी आव्हाने दिली तर त्यांचं उपमुख्यमंत्रीपदही राहणार नाही.
अधिक वाचा : …तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री राहणार नाहीत
मोदींवर टीका करताना ते म्हणाले, मोदी हिंदुत्ववादी नाहीत. त्यांनी उत्तराखंडमध्ये अनेक मंदिरांचे सरकारीकरण केले. त्यांनी कोणत्या चर्चचे सरकारीकरण केले का? 1947 नंतर चर्च आणि मशीदी ताब्यात घेतल्या नाहीत. मग हिंदूंनी कोणते पाप केले आहे? सरकारीकरण झालेली मंदिरं मी न्यायालयात जाऊन मुक्त करणार आहे. मी भाजपच्या जाहीरनाम्यानुसार काम करणार आहे, असेही ते म्हणाले.