आकर्षक चित्ररथ – रोमटामेळ पथकांनी जिंकली केपेवासियांची मने, मान्यवरांचे सत्कार

केपे : ‘चंद्रेश्वरा पायकडले खेळगडे आमी, ताशे ढोलाच्या तालार नाचता आमी’, ‘चान्नीच्या पिला तुका तीन पाट, रावणान सीते व्हेला दाखय वाट’, अशा शिमग्याच्या विविध लोकगीतांवर आणि ढोल-ताशांच्या तसेच ‘ओस्सय’च्या गजरात मोठय़ा उत्साहात केपेत शिमगोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी विविध पौराणिक कथांवर आधारित आकर्षक चित्ररथ, रोमटामेळ पथके, लोकनृत्य पथके, विविध प्रकारच्या वेशभूषा यांनी लोकांचे लक्ष वेधून घेतले. या मिरवणुकीस भाजप प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता, माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, माजी खासदार नरेंद्र सावईकर, माजी मंत्री प्रकाश वेळीप, माजी आमदार क्लाफास डायस, योगेश कुंकळय़ेकर, जिल्हा पंचायत सदस्य खुशाली वेळीप, शाणू वेळीप, संजना वेळीप, नगराध्यक्षा व शिमगोत्सव समितीच्या अध्यक्षा सुचिता शिरवईकर, सचिव प्रसाद फळदेसाई, खजिनदार चेतन हळदणकर व इतर नगरसेवक तसेच शिमगोत्सव समितीचे इतर पदाधिकारी हजर होते.
देवदेवतांना नमन करून व नारळ ठेऊन शिमगोत्सव मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली. प्रारंभी कनिष्ठ व वरिष्ठ गटांत झालेल्या वेशभूषा स्पर्धेत झांशीची राणी लक्ष्मीबाई, श्री महादेव आदी विविध प्रकारच्या वेशभूषा सादर करण्यात आल्या. यात प्रामुख्याने ‘कांतारा’ चित्रपटातील नायकाची साकारलेली वेशभूषा हे प्रमुख आकर्षण ठरले. लोकनृत्य स्पर्धेत फुगडीबरोबर धनगर नृत्य, मुसळनृत्य यासारखी नृत्ये लोकांची दाद मिळवून गेली. केपेच्या जुन्या पोलीस स्थानकापासून चित्ररथ व रोमटामेळ मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. रोमटामेळ पथके फक्त ढोल-ताशे वाजविणारे आणि पदन्यास करणारे कलाकार यांच्यापुरतीच मर्यादित नव्हती, तर काही पथकांनी आकर्षक आतषबाजीही करून उपस्थितांची मने जिंकली. लहान मुलांचा देखील रोमटामेळात उत्साहाने सहभाग दिसला. काही रोमटामेळ पथकांत महिला ढोल-ताशे वाजवताना दिसल्या. त्याचबरोबर वादनाच्या विविध पद्धतीही दिसून केपेतील आबालवृद्धांसाठी ते आकर्षण ठरले. महाभारत-रामायणावर आणि अन्य पुराणकथांवर आधारित आकर्षक चित्ररथांनीही सर्वांची मने जिंकली. यावेळी समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, माजी मत्री प्रकाश शंकर वेळीप, योगेश कुंकळय़ेकर, संदीप फळदेसाई, रेमेडियो रिबेलो यांचे सत्कार करण्यात आले. सूत्रसंचालन संदीप फळदेसाई, खुशाली वेळीप व प्रदीप शिरवईकर यांनी केले.









