चित्रपटाचे पहिले पोस्टर सादर
अभिनेत्री शिल्पा शिरोडकर 25 वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतणार आहे. सलमान खानचा वादग्रस्त शो बिग बॉस सीझन 18 मुळे चर्चेत राहिलेल्या शिल्पाने स्वत:च्या नव्या प्रवासाची घोषणा करत स्वत:च्या आगामी चित्रपटाचे पहिले पोस्टर जारी केले आहे.
शिल्पा शिरोडकर ही 90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री राहिली आहे. तिने सुनील शेट्टी, अनिल कपूर आणि मिथुन चक्रवर्ती यांच्यासह अनेक अभिनेत्यांसोबत काम केले आहे. आता ती एका बॉलिवूडच्या व्हिलनसोबत काम करणार आहे. शिल्पा शिरोडकरने अभिनयापासून ब्रेक घेतल्भ्याच्या 13 वर्षांनी एक टीव्ही शोद्वारे पुनरागमन केले होते, परंतु चित्रपटांपासून ती दूर राहिली होती. परंतु आता ती चित्रपटांमध्ये दिसून येणार आहे. तिच्या आगामी चित्रपटाचे नाव जटाधारी असून याचे चित्रिकरण सुरू झाले आहे.
मी स्वत:च्या नव्या प्रोजेक्टची घोषणा करताना उत्साहित आहे, याची कहाणी वेंकट कल्याण यांनी लिहिली आहे. दिग्दर्शन देखील त्यांनीच केले आहे. हा चित्रपट झी स्टुडिओच्या बॅनर खाली तयार केला जात असल्याची माहिती शिल्पाने दिली आहे.
शिल्पा या चित्रपटात दिग्गज तेलगू अभिनेते सुधीर बाबू यांच्यासोबत दिसून येणार आहे. बागी या हिंदी चित्रपटात त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती. तर जटाधारी या चित्रपटात शिल्पा आणि सुधीर बाबू यांच्यासोबत शिविन नारंग हा अभिनेता दिसून येणार आहे.
शिल्पाने 90 च्या दशकात अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले होते. यात खुदा गवाह, गोपी किशन आणि बेवफा सनम यांचा समावेश आहे. शिल्पाचा अखेरचा चित्रपट गजगामिनी होता, जो 2000 साली प्रदर्शित झाला होता, यानंतर तिने अभिनयापासून अंतर राखले होते. आता 25 वर्षांनी ती बॉलिवूडमध्ये पुनरागमन करत आहे.









